Pune : एमएनजीएलने पटकाविला सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन – कंपनी ऑफ द इयर 2019 पुरस्कार

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज- फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्रीच्या वतीने देण्यात येणारा सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन – कंपनी ऑफ द इयर 2019 हा सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार यंदा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने पटकाविला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. एमएनजीएल ला प्राप्त झालेला हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदर आणि वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के यांनी हा पुरस्कार स्विकारला. पुरस्कार वितरण समारंभात मुख्य महाव्यवस्थापक एस.के. सिंह आणि एमएनजीएलचे बिझनेस डेव्हलपमेंटचे मुख्य व्यवस्थापक अमोल हट्टी उपस्थित होते.

संतोष सोनटक्के म्हणाले,सन २०१८ – २०१९ च्या काळात शहरातील घरगुती, औद्योगिक, वाहतूक व वाणिज्यिक क्षेत्रातील ग्राहकांना नैसर्गिक वायू वितरणाच्या कुशल कार्यप्रणालीसाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये विस्तार, सीएनजी स्थानकांची वाढ, विक्रीचे प्रमाण वाढविणे, घरगुती पीएनजी, आर्थिक कामगिरी ग्राहकांच्या तक्रारीत सुधारणा अशा विविध बाबींवर विचार करुन पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यामध्ये महाराष्ट्र
नॅचरल गॅस हे अव्वल ठरले.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदर यांनी ग्राहक, कंत्राटदार, विक्रेते, कर्मचारी, प्रमोटर, स्टेकहोल्डर्स आणि संचालक मंडळाच्या सतत सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. आणि यापुढेही महाराष्ट्र नॅचरल गॅसच्या माध्यमातून ग्राहकांची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करीत राहू अशा विश्वास त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.