Pune : जम्बो कोविड सेंटरला निधी न देणाऱ्या भाजप विरोधात मनसेचे आंदोलन

MNS agitation against BJP for not providing funds for Jumbo covid Center : स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयात जोरदार घोषणाबाजी

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोना रुग्णांसाठी तयार होणाऱ्या जम्बो कोविड सेंटरला महापालिकेच्या स्थायी समितीने निधी देण्यास नकार दिला आहे. त्या विरोधात मनसेच्यावतीने गुरुवारी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या कार्यालयात आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी रुग्णाला खाली ठेवून शहरात कोरोनाचे संकट किती गंभीर आहे, याचे वास्तव सादर करण्यात आले. या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच साहित्य सोबत आणले होते.

पुणे महापालिकेतर्फे कोरोनाच्या संकट काळात खर्च केलेले पैसे गेले कुठे? किती लोकांचा तुम्ही जीव वाचवला?, असा सवाल मनसेने उपस्थित केला.

कोविड केअर सेंटरची अवस्था अत्यंत वाईट आहे. आम्ही रोज रुग्ण पाहतो. आम्हाला रडायला येते. याची या लोकप्रतिनिधींना लाज वाटत नाही का? असा संतप्त सवाल माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केला.

पुणेकरांना जगविण्याचे काम केले तरच तुम्हाला पुढचे भविष्य आहे. मात्र, या लोकप्रतिनिधींना याची जाण नाही. या लोकप्रतिनिधींना आपला पगार भाजप फंडामध्ये द्यायचा आहे. पुणेकरांचे त्यांना काहीही देणेघेणे नाही, असा आरोपही रुपाली ठोंबरे यांनी केला.

दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचे 51 हजार 738 रुग्ण झाले आहेत. 17 हजार 861 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 1 हजार 254 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.