Pune : मनसेतर्फे वसंत मोरे, अजय शिंदे, किशोर शिंदे, सुहास निम्हण यांना उमेदवारी

एमपीसी न्यूज- शिवसेना, भाजपनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मनसेने 27 उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे, माजी नगरसेवक किशोर शिंदे, अजय शिंदे व सुहास निम्हण यांचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 1) पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली.

हडपसर मतदारसंघातून नगरसेवक वसंत मोरे यांना उमेदवारी मिळाली आहे. मोरे यांनी अगोदरच प्रचाराला सुुरुवात केली असून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर त्यांनी अनेक गैरव्यवहारांचे आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे आता हडपसर मतदारसंघामध्ये तिरंगी लढत पहायला मिळेल.

कसबा पेठ मतदारसंघातून अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेचे संघटनात्मक काम गेल्या अनेक वर्षांपासून शिंदे करत आहेत.
कोथरूड मतदारसंघामधून माजी नगरसेवक किशोर शिंदे याच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली असल्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांच्यासमोर शिंदे यांचे आव्हान असणार आहे. अद्याप आघाडीने या ठिकाणी उमेदवार घोषित केलेला नाही.

शिवाजीनगर मतदारसंघामधून सुहास निम्हण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याठिकाणी भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांचे त्यांना आव्हान असेल. काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.