Pune : चोरीचा मोबाईल विकत घेणा-या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – चोरीचा मोबाईल फोन विकत घेणा-या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. 23) कुरकुंभ येथे केली.

कुणाल बबन मोरे (वय 21, रा. वाटळूज, ता. दौड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारी रोजी रात्री भिगवण मधील ब्ल्यू डार्ट कंपनीच्या कार्यालयाचे शटर उचकटून कुरियरच्या बॅगमधील मोबाईल फोन, लॅपटॉप, कपडे यांसारखा एकूण 1 लाख 86 हजार 228 रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुरकुंभ येथून कुणाल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करत त्याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील एमआय कंपनीचे तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

मिळालेल्या चोरीच्या मोबाईल फोनबाबत चौकशी केली असता त्याने ते मोबाईल फोन त्याच्या एका मित्राकडून घेतल्याचे सांगितले. यावरून कुणाल याला अटक करून पुढील कारवाईसाठी भिगवण पोलिसांकडे देण्यात आले असून मुख्य आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. चोरीचे साहित्य खरेदी करणे हा देखील अपराध असून असे साहित्य खरेदी करणा-यांना देखील शिक्षा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी जुनी वस्तू घेताना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.