Pune : नोटबंदी, जीएसटीने देशाचे कंबरडे मोडले!; खासदार राजीव गौडा आणि अमी याग्निक यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

8 नोव्हेंबरपासून अखिल भारतीय काँगेस कमिटीतर्फे देशभर आंदोलन

एमपीसी न्यूज – नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाचे कंबरडे मोडले. देशात मंदी असून सामान्य माणसाच्या खिशातील पैसे मोदी सरकारने काढले, केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणा विरोधात दिनांक 8 नोव्हेंबर पासून अखिल भारतीय काँगेस कमिटीतर्फे देशभरात आंदोलन आयोजित केले आहे, अशी माहिती खासदार राजीव गौडा आणि अमी याग्निक यांनी आज काँगेस भवन येथे पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, प्रवक्ते गोपाळ तिवारी, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, ऍड. अभय छाजेड, रमेश अय्यर उपस्थित होते.

दिवाळी नुकतीच संपली. मात्र, सामन्य माणसाजवळ पैसा दिसला नाही. नोटबंदीमुळे सर्व पैसा गेला. डॉ. मनमोहन सिंग यांनी ही सुरुवात असल्याचे म्हटले होते, ते आता खरे होत आहे, ही तर सुरुवात आहे, आणखी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला. बेरोजगारांना रोजगार नाही. दोन कोटी रोजगार देणार असल्याच्या अश्वासनाचे काय झाले? छोट्या मोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. पण, सरकार काहीही बोलायला तयार नाही. छोट्याशा पाकिस्तानवर चर्चा होते. मात्र, मुलांचे भविष्य मोदी सरकारला दिसत नाही. ते शिक्षणावर का बोलत नाही? असा सवालही अमी याग्निक यांनी उपस्थित केला.

कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देत आहेत. पण, यातून लोकांच्या खिशातून पैसे काढण्याचे काम सुरू आहे. देशात गरिबी झपाट्याने वाढती आहे. शेतकऱ्यांसाठी काहीही योजना नाही. ‘राईट टू एज्युकेशन’ चे काय झाले? किती लोकांना रोजगार दिले? काहीही बोलत नाही.

‘पीएमसी’ बँक घोटाळ्यावर काहीही बोलत नाहीत. ‘मेक इन इंडिया’चे काय झाले? ‘आरबीआय’ मधून पैसा काढण्यात आला. तो कुठे गेला? तरीही ‘इकॉनॉमी’ खाली का जात आहे? 5 ट्रेलियन डॉलर इकॉनॉमी काशी पूर्ण होणार? असे अनेक सवाल राजीव गौडा आणि अमी याग्निक यांनी उपस्थित केले.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधी, प्रियंका गांधी प्रचारात सहभागी न झाल्याने काँग्रेसचे नुकसान झाले? असे सांगितले असता, याची कल्पना सोनिया गांधी यांना देणार असल्याचे राजीव गौडा यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.