Pune : मान्सून परतीच्या प्रवासाला लागला !

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रासह संपूर्ण देशात यंदाच्या मोसमामध्ये हाहाकार माजविणाऱ्या मान्सूनने अखेर परतीचा प्रवास सुरु केला आहे. मान्सूनने रविवारी राज्याच्या उत्तर भागातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे अशी माहिती ने दिली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस पुणे शहरात वातावरण ढगाळ राहणार असून, पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

यंदाच्या पावसाने प्रशासकीय यंत्रणेबरोबरच नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. पुण्यात 25 सप्टेंबर रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर अनेक वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली. या पावसात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला.  त्यापूर्वी जून महिन्यात कोंढवा येथे इमारतीच्या कम्पाउंडची भिंत कोसळून 15 बांधकाम मजूर मृत्युमुखी पडले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात तर पुराच्या पाण्याने थैमान घातले. या भागातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. याच पावसात कोल्हापूरहून मुंबईला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस पुराच्या पाण्यात तब्बल बारा तास अडकून पडल्याची घटना घडली. एकूणच सर्वत्र हाहाकार माजविणाऱ्या मान्सूनने आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केल्यामुळे सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. राज्यातून सप्टेंबरच्या अखेरीस तो बाहेर पडतो. मात्र, या वर्षी पावसाला परतीसाठी अनुकूल वातावरण नसल्याने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सून राजस्थानमधून बाहेर पडला आणि गेल्या दोन दिवसांत मान्सूनने आणखी तीन राज्यातून माघारी फिरला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या काही भागांतून; तसेच महाराष्ट्राच्या उत्तर बाजूला काही भागांतून मान्सून परतीच्या प्रवासाला लागला आहे. असे हवामान विभागाने कळवले आहे.

परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण असल्याने या आठवड्यात मान्सून राज्यातून बाहेर पडणार आहे. पुढील दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस, तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.