Pune: दुबईहून आलेल्या आई-बाळाला केले रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज – दुबईहून आज पहाटे पुणे विमानतळावर उतरलेल्या विमानातून उतरलेल्या एका 26 वर्षीय महिलेला व तिच्या एक वर्षांच्या बाळाला त्यांनी स्वतः खोकला असल्याचे सांगितल्याने दक्षतेचा उपाय म्हणून त्यांना पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्पाइसजेट एअरलाइन्सचे दुबई ते पुणे हे विमान आज (गुरुवार) पहाटे 4:05 वा पोहोचले.  त्या विमानातून 74 पुरुष, 41 महिला, 10 लहान मुले 10 आणि चार लहान बाळं असे एकूण 129 प्रवासी उतरले. त्यामध्ये 118 भारतीय नागरिक तर 11 परदेशी नागरिक होते. सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये कोरोनाचा कोणीही संशयित रुग्ण आढळून आला नाही. 15 फेब्रुवारीनंतर आजपर्यंत चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशातून प्रवास करून आलेल्यांपैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत, असे शासकीय प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

भारतीय नागरिकांपैकी एक महिला (वय 26) आणि तिचे लहान बाळ (वय 1) यांनी स्वतःहून आजारी (कफ) असल्याचे नमूद केल्याने त्यांना नायडू रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. उर्वरित सर्व प्रवाशांना त्यांच्या स्वतःच्या घरी आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  पुणे जिल्हा प्रशासन ,पुणे विमानतळ व्यवस्थापन , वैद्यकीय पथक आणि पोलीस प्रशासन यांच्या मदतीने ही कार्यवाही करण्यात आली.

संबंधित आणखी बातम्या वाचा –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.