Pune : सुट्टीच्या दिवसात मुलांच्या भेटीला प्रेरक गोष्टी!

एमपीसी न्यूज : विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी संस्थेच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे (Pune) डॉ. प्रकाश बोकील लिखित ‘गोष्टी, गोष्टी, पन्नास गोष्टी!’ या 5 पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन रविवार (23 एप्रिल) सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आले.  विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्षा पद्मश्री डॉ. निवेदिता भिडे यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ सोहळा पार पडला. विमलाबाई गरवारे प्रशाला (डेक्कन कॉर्नर) येथे हा कार्यक्रम झाला.

विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर, नितीन कीर्तने यावेळी उपस्थित होते. जागतिक पुस्तक दिनानिमित्त हा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 50 प्रेरक व्यक्तिमत्त्वांच्या गोष्टी या पुस्तक संचात एकत्र करण्यात आल्या आहेत.

सुट्टीच्या दिवसात मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी हे गोष्टींचे पुस्तक तयार करण्यात आले आहे. वाचनातून मूल्य शिक्षणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची रचना केलेली आहे.

डॉ. निवेदिता भिडे म्हणाल्या, ‘मुलांच्या भाव जागरणासाठी गोष्टी उपयुक्त असतात. स्वभावाला समजून जीवनाला दिशा देण्यासाठी हे माध्यम वापरावे. हे गोष्टी सांगणं, कमी होऊ नये. गोष्टी फुलवण्याची कला कमी होऊ नये. घरातील सर्वांनी कला शिकून घ्यावी.

त्यासाठी वाचन वाढवावे. चांगल्या गृहस्थाश्रमासाठी हे होणेआवश्यक आहे. ‘कोणत्याही वयोगटात गोष्टी आकर्षून घेतात. भारतात गोष्टी मोठया प्रमाणात सांगितल्या जातात. महान व्यक्तीमत्वांवर गोष्टी, किस्से, कहाण्या (Pune) तयार होतात. त्या परत परत सांगितल्या जातात. त्यातून काय संदेश घ्यायचा हे मुलांना कळत असते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रकाश बोकील म्हणाले, ‘सद्वर्तनाच्या प्रवासाचा प्रारंभ या पुस्तक वाचनातून होतो. चांगल्या वागण्याची प्रेरणा होणार आहे. संवेदनशीलता वाढण्यास मदत होणारआहे. उपदेशाचे डोस न पाजता हसत खेळत मूल्य संवर्धनाचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

मंजुषा लिमये यांनी सूत्रसंचालन केले. वसुधा करंदीकर, वैदेही गोडबोले, सुमीत शिवहरे, हार्दिक मेहता, विश्वास लापालकर, श्रीकांत काशीकर, विवेक गिरीधरीकर, अंजली भडाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. दीपक कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.