BNR-HDR-TOP-Mobile

Pune: ‘एमपीसी न्यूज’ व ‘इन्फानाईट वन’ यांच्यात व्यावसायिक भागीदारी करार

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले मराठी न्यूज पोर्टल ‘एमपीसी न्यूज डॉट इन’ व इन्फानाईट वन व्हेंचर्स अँड सोल्यूशन्स या डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल सर्विसेस क्षेत्रातील नामवंत कंपनीमध्ये काल (सोमवारी) संध्याकाळी व्यावसायिक भागीदारी करार झाला.

‘एमपीसी न्यूज’चे संचालक व संपादक विवेक इनामदार आणि ‘इन्फानाईट वन’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश लोलयेकर यांनी या व्यावसायिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. त्यावेळी ‘इन्फानाईट वन’चे संचालक ओबेद खान आणि प्रकाश कुलकर्णी उपस्थित होते.

या करारानुसार संपादकीय व तांत्रिक जबाबदारी एमपीसी न्यूज प्रा. लि. सांभाळणार असून मार्केटिंग आणि ब्रँड डेव्हलपमेंटची धुरा ‘इन्फानाईट वन’ कंपनीने स्वीकारली आहे. या व्यावसायिक भागीदारीमुळे एमपीसी न्यूज हे शहरातील सर्वात पहिले सिटी न्यूज पोर्टल हे शहरातील सर्वात मोठे न्यूज पोर्टल होईल, असा विश्वास इनामदार यांनी यावेळी व्यक्त केला.

या करारामुळे ‘एमपीसी न्यूज’ची व्याप्ती व विस्तार अधिक वाढण्यास मदत होणार असून त्याचा फायदा वाचकांबरोबरच शहर व परिसरातील उद्योजक, व्यापारी व व्यावसायिक यांना होईल, अशी ग्वाही लोलयेकर यांनी दिली. एमपीसी न्यूज पोर्टलबरोबर व्यावसायिक भागिदारी दोन्ही संस्थांचा उत्तम विकास साधेल आणि वाचकांना तसेच जाहिरातदारांना उत्तम सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज विषयी…

एमपीसी न्यूज डॉट इन हे पुणे, पिंपरी-चिंचवड व परिसरातील घडामोडींविषयी शहरवासीयांना अपडेट ठेवणारे पहिले मराठी सिटी न्यूज पोर्टल आहे. पत्रकारितेतील 30 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या विवेक इनामदार व हृषीकेश तपशाळकर या दोन पत्रकारांनी जुलै 2008 मध्ये हे न्यूज पोर्टल सुरू केले. गेल्या 11 वर्षांत निष्पक्ष, निर्भिड व विश्वासार्ह पत्रकारितेचा वसा जपत तसेच ‘राहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही!’ हे ‘ब्रँड प्रॉमिस’ पाळत ‘एमपीसी न्यूज’ने स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. विवेक इनामदार, हृषीकेश तपशाळकर, राहुल गावडे, अमित बोरसे व अनिल कातळे हे या कंपनीचे संचालक आहेत.

इन्फानाईट वन विषयी…

इन्फानाईट वन व्हेंचर्स अँड सोल्यूशन्स ही कंपनी डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल सर्विसेस क्षेत्रातील नामवंत कंपनी आहे. हि कंपनी गुगल पार्टनर कंपनी असून सलग दोन वर्षे (2016-17) गुगलचा उत्कृष्ट डिजिटल कंपनीचा पुरस्कार मिळाला आहे. नीलेश लोलयेकर, ओबेद खान आणि प्रकाश कुलकर्णी हे कंपनीचे प्रवर्तक आहेत आणि विविध नामवंत संस्थांमध्ये कामाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like