Pune : दररोज 1 हजार कोरोना टेस्ट करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

15 मे पर्यंत परिस्थिती सर्वसामान्य होण्याचा अंदाज

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाच्या दररोज 1 हजार टेस्ट करण्यासाठी प्रशानाकडून हालचाली सुरू आहेत. सध्या रोज 500 ते 700 टेस्ट करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात टेस्ट होत असल्याने रुग्णही झपाट्याने वाढत आहे. दि. 15 मे पर्यंत पुण्यात सर्वसामान्य परिस्थिती होणार असल्याचा अंदाज महापालिका आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

गुरुवारी कोरोनाचे तब्बल 104 रुग्ण आढळले. तसेच 4 नागरिकांचा मृत्यूही झाला. 13 मार्चपासून आतापर्यंत आढळून आलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर, सध्या 36 कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. प्रशासनाने 15 मे पर्यंत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येणार असल्याचे सांगितले असले तरी, जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रीय आरोग्य विभागातर्फे संकट आणखी वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पुणे शहराचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी करून नागरिकांना बाहेर निघण्यास अटकाव केला आहे. आतापर्यंत शहरात कोरोनाच्या जवळपास साडे 9 हजार टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये साडे 8 हजार टेस्ट निगेटिव्ह आल्या. 985 व्यक्ती पॉझिटिव्ह असून, 61 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनामुळे बरे होऊन 100 च्या आसपास रुग्ण घरी गेले.

दरम्यान, पुणे शहरात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने भिलवाडा किंवा बारामती पॅटर्न राबविण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर, लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.