Pune : खासदार गिरीश बापट यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघांत भाजपचा पराभव झाला होता. नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. ‘पाणी नाही तर’ मत नाही’, अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. चार मतदारसंघांत तर भाजपला निसटता विजय मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर आज खासदार गिरीश बापट यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीत अधिकाऱ्यांची चांगलीच बापट यांनी झाडाझडती घेतल्याची कुजबुज महापालिकेत सुरू होती. 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजनेचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. 24 तास तर सोडा. सध्या 2 ते 4 तासही पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. करंगळी एवढी नळाला धार असते, तेवढ्यात पाणी कसे पुरणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

चांदणी चौक उड्डाणपुलाचेही काम अतिशय कासव गतीने सुरू आहे. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या पुलामुळे परीसरातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

भामा – आसखेड योजनेसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुमारे 45 कोटी रुपये दिले. दि. 31 डिसेंबर 2019 पर्यंत ही योजना मार्गी लागणार असल्याचा दावा करण्यात येत होता. पण, खरच ही योजना पूर्ण होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. नगररोड, खराडी, चंदननगर, हडपसर, पिंपरी – चिंचवड परिसरात या योजनेमुळे पाणी मिळणार आहे. या योजनेचे काम पूर्ण न झाल्यानेच भाजपच्या आमदाराचा पराभव झाल्याची खमंग चर्चा वडगावशेरी मतदारसंघात सुरू आहे.

शिवाजीनगर मतदारसंघतील आपटे रोड, डेक्कन, गोखलेनगर परिसरात नागरिकांची साध्याही पिण्याच्या पाण्यासाठी आरडाओरड सुरू आहे. खडकवासला मतदारसंघातील वारजे भागातील सोसायट्यांमध्येही पाण्याला कमी प्रेशर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.