Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खासदार संजय राऊत घेणार ‘प्रकट मुलाखत’

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत ‘प्रकट मुलाखत’ घेणार आहेत. 19 वे साहित्यिक कलावंत संमेलनात खुद्द संजय राऊतच शरद पवार यांची रविवारी (दि. 29 डिसेंबर) दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत मुलाखत घेणार आहेत. हे संमेलन शनिवारी (दि. 28) आणि रविवारी (दि. 29 डिसेंबर रोजी) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे  आयोजित केले आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँगेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची अतिशय महत्वपूर्ण भूमिका होती. मागील दोन ते अडीच महिन्यांत सरकार स्थापन करण्यात पडद्यामागे बऱ्याच हालचाली झाल्या. यांची उकल ‘प्रकट मुलाखत’मध्ये होणार आहे.

या संमेलनात विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून साहित्य-कलेचा राजकारणाशी संबंध येतो. या संमेलनाचे उदघाटन अर्थमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 28 डिसेंबर) सकाळी 10.30 वा. होणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे, महापौर मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित राहणार आहेत. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नंतर संजय राऊत मुलाखत घेणार असल्याने पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.