Pune MSEDCL News : पुणे जिल्ह्यातील पाच लाखांहून अधिक ग्राहकांची एप्रिलपासून वीजबिले थकीत

एमपीसी न्यूज : गेल्या एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 5 लाख 86 हजार वीजग्राहकांनी एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही. वीजपुरवठा सुरू असलेल्या या सर्व ग्राहकांकडे सद्यस्थितीत तब्बल 576 कोटी 91 लाख रूपयांची थकबाकी आहे.

तसेच जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 13 लाख 80 हजार ग्राहकांकडे तब्बल 1072 कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी आहे. हा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी व वीजक्षेत्रातील संभाव्य अरिष्ट टाळण्यासाठी ग्राहकांनी चालू तसेच थकीत वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

ही थकबाकी पुणे शहर (244 कोटी), पिंपरी-चिंचवड शहर (102 कोटी) तसेच ग्रामीणमधील मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर, हवेली, आंबेगाव, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांमधील (230 कोटी 89 लाख) इतकी आहे.मात्र, ऑक्टोबरपासून चालू वीजबिलांसह थकबाकी भरण्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महावितरणाने सांगितले.

देशभरात सर्वाधिक म्हणजेच सुमारे पावणेतीन कोटी वीजग्राहक हे महावितरणचे आहेत. विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसवण्यासाठी ग्राहकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.

लघुदाब वर्गातील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणाच्या www.mahadiscom.in किंवा मोबाईल ॲपवर किंवा वीजबिल भरणा केंद्रात बिले भरण्याची सोय उपल्ब्ध आहे. लॉकडाऊनमधील वीजबिलांबाबत शंका असल्यास त्याची पडताळणी किंवा तपशील हा https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.