Pune : महावितरण म्हणते… विश्वास ठेवा, वीजबिल अचूकच !

MSEDCL says ... believe me, the electricity bill is accurate!

0

एमपीसी न्यूज – जून महिन्यात वाढवून आलेले वीज बिल हे अचूकच असल्याचा निर्वाळा महावितरणने दिला आहे. केवळ मीटर रिडरकडून अनावधानाने रिडींग घेण्यात काही चूक झाली असल्यासच वीजबिल चुकीचे असू शकते. मात्र, महावितरणकडून रिडींगप्रमाणे देण्यात येणारी वीजबिले चुकीचे आहेत हा गैरसमज ग्राहकांनी करून घेऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

याबाबत महावितरणने म्हटले आहे की, मार्चनंतर प्रथमच वापरलेल्या विजेचे प्रत्यक्ष रिडींग जून महिन्यात घेण्यात आले असून जूनच्या वीजबिलात लॉकडाऊनच्या कालावधीमधील (सुमारे 90 ते 97 दिवस) वीजवापरानुसार युनिट संख्या नोंदविण्यात आली आहे.

या युनिट संख्येला सुमारे तीन महिन्यांत विभागून योग्य स्लॅब दरानुसार वीजबिलाची आकारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड लादलेला नाही, अशी ग्वाही देत वीजग्राहकांनी वीजबिलावर विश्वास ठेवावा, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

लॉकडाऊनमुळे एप्रिल व मे महिन्यात मीटर रिडींग उपलब्ध होऊ न शकलेल्या वीजग्राहकांना मागील तीन महिन्यांच्या वीज वापरानुसार सरासरी वीजबिल पाठविण्यात आले. मात्र, जून महिन्यात मीटर रिडींगची प्रक्रिया सुरु झाली. त्यामुळे मार्च ते जूनपर्यंत वीज वापराची एकूण युनिट संख्या ही जूनच्या वीजबिलात नोंदविण्यात आलेली आहे.

प्रत्यक्षात ही युनिट संख्या केवळ जून महिन्याची नाही तर लॉकडाऊनच्या कालावधीमधील सुमारे 90 ते 97 दिवसांची आहे. या युनिट संख्येला तीन महिन्यांनी विभागून स्लॅबप्रमाणे 31 मार्चपूर्वीच्या व 1 एप्रिलनंतरच्या वीज दरानुसार बिलांची आकारणी करण्यात येत आहे.

समजा जूनच्या बिलामध्ये एकूण 612 युनिट संख्या नोंदविण्यात आली आहे. तर तीन महिन्यांसाठी प्रत्येकी 204 युनिटचा वापर झाला आहे, असा हिशेब करून त्यातील पहिल्या 100 युनिटला 0 ते 100 आणि दुसऱ्या 104 युनिटला 101 ते 300 युनिट स्लॅबनुसार वीजदर लावण्यात येत आहे.

यामध्ये आकारणी करण्यात आलेल्या एकूण रकमेत एप्रिल व मे महिन्यांचे वीजबिल भरलेले आहे असा हिशेब करून फिक्स चार्जेस व त्यावरील वीजशुल्क वगळून उर्वरित भरलेली रक्कम वजा करण्यात येत आहे. मात्र एप्रिल किंवा मे महिन्याचे बिल ग्राहकांनी भरलेले नसल्यास ते थकबाकी म्हणून दाखविण्यात येत असल्याचे महावितरणने सांगितले आहे.

वीज बिलात अडचण असल्यास दुरूस्ती करून दिली जाणार

ग्राहकांना देण्यात आलेले वीज बिल हे मागच्या तीन महिन्याचे आहे. सरासरीनुसार पाठवलेले वीज बिल ग्राहकांनी भरले असल्यास त्यांना तो फरक वजा करून बिल देण्यात आले आहे.

तरीसुद्धा वीज बिलासंबधी तक्रार अथवा शंका असल्यास जवळच्या महावितरण कार्यालयात तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करून दिली असून वीज बिलात चूक आढळून आल्यास चूक दुरूस्त केली जाईल, असे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

राऊत पुढे म्हणाले की, एप्रिलमध्ये वीज दर वाढले आहेत तो फरक देखील वीज बिलात समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच घरगुती वीज बिलाचा हिशेब तपासण्यासाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीजग्राहकांनी रिडींगप्रमाणे दिलेल्या वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये.

एप्रिल, मेमधील लॉकडाऊनचा कालावधी, प्रखर उन्हाळा व सर्वच जण घरी असल्याने वाढलेला वीजवापर आदींमुळे युनिटची संख्या वाढलेली आहे असे निशिकांत राऊत म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like