Pune : शिवाजीनगर बस स्थानक होणार मल्टीमोडल हब

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रो शहरात विकासाचा नवा पॅटर्न घेऊन आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रोसोबत अनेक नव्या गोष्टींचा अनुभव येणार आहे. शिवाजीनगर बस स्थानकाच्या खाली मेट्रोचे स्टेशन असणार आहे. महामेट्रो शिवाजीनगर बस स्थानकाचा कायापालट करून त्याजागी मल्टिमोडल हब बनविणार आहे. यामुळे बस स्थानकासह आसपासच्या परिसराचा चेहरा-मोहरा बदलून जाणार आहे.

पुणे मेट्रोचा कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा पाच किलोमीटरचा टप्पा भुयारी आहे. शिवाजीनगर बस स्थानकाखाली पुणे मेट्रोचे शिवाजीनगर मेट्रो स्थानक असणार आहे. मेट्रोकडून शिवाजीनगर बस स्थानकाला मल्टिमोडल हबच्या धर्तीवर बांधण्यात येणार आहे. यामुळे एस टी बस, पीएमपीएमएल बस, शिवाजीनगर रेल्वे स्थानक आणि मेट्रो यांना जोडण्यात येणार आहे.

  • मेट्रो स्थानकांवर प्रवाशांना सहजगत्या जाण्यासाठी शिवाजीनगर बस स्थानक, आकशवाणी केंद्र, (सिमला ऑफिस चौक) , पुणे रेल्वे स्थानक ही ठिकाणे भुयारी मार्गांनी जोडण्यात येणार आहेत.

पुणे मेट्रो कॉमन मोबिलिटी कार्ड ही सुविधा अंमलात आणणार आहे. त्यामुळे पीएमपीएमएल, रेल्वे व एस टी बससाठी वेगळे तिकीट घेण्याची गरज पडणार नाही. शिवाजीनगर मेट्रो बस स्थानकाचे निर्माण कामादरम्यान स्थानकाजवळील संपूर्ण परिसर विकसित करण्यात येणार आहे.

  • अंत्यत मोक्याच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर चौकाचे देखील नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीची समस्या सुटणार आहे. पार्किंग, सायकल ट्रॅक, पदपथ, ऑटो रिक्षा पार्किंग यांसारख्या विविध गोष्टींचे नियोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.