Pimpri : आमदार जगताप यांच्यासह रिलायन्स कंपनी अधिकाऱ्यांकडून पुणे-मुंबई महामार्गाची पाहणी

रस्त्याची डागडुजी तात्काळ करण्याचे कंपनीचे आश्वासन  

एमपीसी  न्यूज – शहरातील पुणे-मुंबई  महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची ये – जा सुरु असते. वाहनांच्या वर्दळीमुळे महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नॅशनल हायवे ऑफ ऑथिरीटी इंडियाचे अधिकारी यांच्याकडे मागणी करुन देखील कामे पूर्ण झाली नाहीत. आमदार लक्ष्मण जगताप यांनी नॅशनल हायवे ऑफ अॅथॉरिटी इंडियाचे अधिकारी व रिलायन्स कंपनीचे मुख्य  महाव्यवस्थापक बी.के.सिंघ यांच्याबरोबर पाहणी केली.

पुणे-मुंबई हा देशातील पहिला द्रुतगती महामार्ग आहे. हा द्रुतगती मार्ग सहापदरी करण्याचे काम रिलायन्स कंपनीला मिळालेले आहे. या कंपनीमार्फत सध्या काम सुरू आहे. हा महामार्ग वाकड ते रावेत-किवळे दरम्यान पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून जातो. पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे सुशोभिकरण करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे या महामार्गाच्या शेजारचे सर्व्हिस रस्ते चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे आसपासच्या परिसरातील वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे.

या सर्व बाबींची दखल घेऊन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी (दि. २३) बैठकीसाठी पाचारण केले होते. या बैठकीत त्यांनी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील दुरवस्थेबद्दल अधिकाऱ्यांना कडक शब्दांत जाब विचारला. महामार्गाची दुरवस्था दूर करण्यासाठी पुरेसे लक्ष दिले जात नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुशोभिकरण करण्यासाठी आजपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. अशा प्रकारचा निष्क्रिय कारभार यापुढे खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना निक्षून सांगितले.

पुणे-मुंबई महामार्गाची देखभाल, ग्रेड सेपरेटर लगत असणारे सुशोभीकरण करणे, सर्व्हिस रोड व्यवस्थित करणे आदींची  रस्त्याची पाहणी आज करण्यात आली.  ब-याच वर्षापासून पुणे-मुंबई महामार्गावरील रस्त्याची देखभाल, दुरुस्तीचे रखडलेले काम त्यामुळे रस्त्याची झालेली दुरावस्था नॅशनल हायवे ऑफ ऑथिरीटी इंडियाचे अधिका-यांना दाखविण्यात आली.
यावेळी एक महिन्याच्या आत महामार्गाची कामे पूर्ण होतील असे आश्वासन रिलायन्स कंपनीचे मुख्य महाव्यवस्थापक बी.के. सिंघ यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.