Pune : कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रविवारी दिले आहेत. दिनांक 11 मे रात्री 12 पासून ते 17 मे 2020 पर्यंत कोरोनाच्या कॉन्टेनमेंट झोनमधील दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

अत्यंत आवश्यकता भासल्यास दूध आणि भाजीपाला व इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा पुणे महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता घरपोच करण्यात येणार आहे. किंवा या क्षेत्राच्या आत मोठ्या मोकळ्या जागेवर सुरक्षित अंतराचे पालन करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्रांतील कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे पुणे शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे शहरात कोरोनाचे 69 प्रतिबंदीत क्षेत्र असून यापूर्वी या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दुकानांची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 होती. मात्र, नागरिकांची वाढती गर्दी काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.

दररोज कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने या भागांत लॉकडाऊन आणखी कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, कोरोना नसलेल्या भागांत 12 तास दुकाने सुरू करण्यास सांगितले आहे. कोथरूड – कर्वेनगर, वारजे – माळवाडी, शिवणे, उत्तमनगर, सिंहगडरोड, बाणेर – बालेवाडी – बावधन भागांत लॉकडाऊन शिथिल केल्याने वर्दळ वाढली आहे.

दरम्यान, पुणे जिल्हयात कोरोनाचे 2 हजार 830 बाधीत रुग्ण असून 938 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 741 आहे. कोरोनाबाधित एकूण 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 96 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.