Pune : पावसाळा पूर्व कामांच्या नियोजनाचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

एमपीसी न्यूज – पावसाळा पूर्व कामकाज सद्यस्थितीत कोणत्या टप्प्यावर आहे. विविध विभागातील नियोजनाची तयारी कुठपर्यंत आली आहे, याचा महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी घेण्यात आलेल्या बैठकीत आढावा घेतला.

पुणे महानगरपालिकेच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ( जुने सभागृहात ) ही बैठक झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, शांतानु गोयल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सर्व परिमंडळ आयुक्त, उपायुक्त, खातेप्रमुख, मनपा सहाययक आयुक्त व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पावसाळा पूर्व कामांच्या पुर्ततेच्या अनुषंगाने विविध खातेनिहाय व क्षेत्रीय कार्यालयांनी पावसाळा पूर्व केलेली कामे, पुढील कालावधीत करावयाची कामे, कामांच्या पुर्ततेकरिता आवश्यक साधनसामुग्रीचा यावेळी आढावा घेण्यात आला.

मनुष्यबळ नियोजन, कोरोना बाधित, संशयित रुग्ण यांच्याकरिता स्वतंत्र नियोजन करावे. पूरग्रस्तांकरिता स्वतंत्र शाळा व शेल्टर्स नियोजन, चेंबर्स, ओढे, नाले, मल निःस्सारण व जलवाहिन्यांची दुरुती करण्यात यावी.

स्वच्छता कामे, रस्ते, कलव्हर्टची कामे, धोकादायक वाडे, मिळकती, गावठाणातील जुने वाडे, घरे, भिंती, त्याचबरोबर शहरातील धोकादायक मिळकती, सीमाभिंती, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे यांच्यावरील करण्यात आलेल्या कारवाईचीही यावेळी माहिती देण्यात आली.

धोकादायक वृक्ष, पंप, पाणी उपसा करण्याकरिता पंपांची उपलब्धता, बोटी, जीवरक्षक २४×७ व मेट्रो संदर्भातील अडथळा ठरणारी कामे सुचविण्यात आली. जेसीबी, पोकलेन, ध्वनिक्षेपन यंत्रणा, कंटेन्मेंट व नॉन कंटेन्मेंट झोनमधील कामे,अनधिकृत जाहिरात फलक, औषधं, कीटकनाशके फवारणी, झाडपडी घटनांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अधिकारी – कर्मचारी प्रशिक्षण, अशा विविध कामकाजा संदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला. या सर्व कामकाजा संदर्भात नजीकच्या कालावधीत पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर पाहणी करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.