Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचा सर्व पक्षीय नेत्यांशी संवाद

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट भयंकर झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी राजकीय नेत्यांशी गुरुवारी सकाळी संवाद साधला. राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने स्मार्ट सिटी कार्यालयात ही बैठक झाली.

यावेळी महापालिका आयुक्तांनी कोरोना संदर्भात केलेल्या उपायांची अतिशय सविस्तर माहिती दिली. त्यानंतर झालेल्या चर्चेत सगळ्यांनी अनेक विषयांवर शहराच्या वेगवेगळ्या भागातील समस्या आयुक्तांच्या कानावर घातल्या. त्या पैकी काहींची त्यांनी लगेच दखल घेऊन कार्यवाही करतो, असे देखील सांगितले.

पुढच्या लॉकडाऊनमधील काही गोष्टीसाठी आतापासूनच तयारीला लागल्याचे आयुक्त म्हणाले. एकंदरीत महापालिका करीत असलेल्या कामाची सर्वांना माहिती मिळाली आणि सर्वांनी त्यात समाधान व्यक्त केले.

या बैठकीमध्ये आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी महापौर अंकुश काकडे, दत्तात्रय धनकवडे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी सहभाग घेतला.

पुणे शहरातील कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा रात्रंदिवस काम करीत आहे. ज्या भागांत कोरोनाचे रुग्ण क्वारंटाईन करण्यात आले आहे, याची माहिती आयुक्तांनी दिली. पुण्यात एकूण 69 कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. या भागातील नागरिकांना घरपोच जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.