Pune: गटनेत्यांना विश्वासात घेतल्याशिवाय बजेटबाबत कोणताही निर्णय नको- दीपाली धुमाळ

pune municipal corporation leader of the opposition deepali dhumal on 2020-21 budget

एमपीसी न्यूज- 2020-21 च्या संपूर्ण बजेटला महापालिका प्रशासन कात्री लावण्याच्या तयारीत आहे. हे बजेट कमी करण्यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, असे आवाहन पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलेल्या पत्रात केले आहे.

पुणे महापालिकेचे सन 2020-21चे अंदाजपत्रक मंजूर होऊन या संबंधी दि.1 एप्रिलपासून प्रत्यक्ष या अंदाजपत्रकातील विकासकामांना सुरुवात होणे गरजेचे होते. परंतु, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बजेटवर परिणाम झाला आहे. सर्व महापालिका प्रशासन या रोगावर मात करण्यात प्रयत्नशील आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन आणखी किती दिवस सुरू राहील, याची कोणतीही शाश्वती नाही.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द आयुक्तांनीच बजेटचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आपण बजेट संदर्भात सर्व पक्ष नेत्यांबरोबर विचारविनिमय करून निर्णय घ्यावा, असेही दीपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.

शासनाच्या आदेशाप्रमाणे चक्राकार पद्धतीने ड्यूटी दिली जात नाही
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे कोव्हिड रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना चक्राकार पध्दतीने सात दिवस प्रत्येकी सहा तासांची ड्यूटी देणे आवश्यक आहे. मात्र, नायडू रुग्णालयासह महापालिकेच्या सर्व रूग्णालये आणि कोव्हिड सेंटरमध्ये या नियमांचे पालन होत नाही.

त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर आयुक्तांनी वेळीच लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.

पुणे शहरासह संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नायडू रूग्णालयात गेल्या 3 महिन्यांपासून डॉक्टर, परिचरिका व इतर सेवक कार्यरत आहेत. जीव धोक्यात घालून हे कर्मचारी काम करीत आहेत. सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात राहावे लागत असल्याने मागील 10 दिवसांत 5 परिचरिकांना बाधा झाली आहे. मात्र, प्रशासनातर्फे कोणतीही दाखल घेतली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.