Pune : पहिल्याच सर्वसाधारण सभेत भाजपची नाचक्की ; सभा सुरू असतानाच सभागृहात पडला ठोकळा

एमपीसी न्यूज  : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमधील सभागृहाच्या निकृष्ट कामाबाबत अनेक वादानंतर आज अखेर कामकाजाला सुरुवात झाली.

मात्र , नवीन सभागृहात पहिलीच सर्वसाधारण सभा सुरू असतानाच अचानक सभागृहात एक लाकडी ठोकला पडला. सुदैवाने हा लाकडी ठोकळा नगरसेवक बसतात त्या जागेच्या थोडा पुढे पडल्याने कोणालाही इजा झाली नाही. दरम्यान, इमारतीचे काम अपूर्ण असल्याची टीका वारंवार होत आहे. तर 21 जूनला या सभागृहाचे उदघाटन उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं होतं. त्यावेळी हे सभागृह पावसाच्या पाण्याने गळल्याने सत्ताधारी भाजपला चांगलंच तोंडघशी पाडाव लागलं होत.

अशातच आता पहिल्याच सभेत ठोकला पडल्याने भाजपला विरोधकांनी कोंडीत पकडलं आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे सभागृहात चक्क हेल्मेट घालून बसले होते.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्या उभारण्यात आलेल्या इमारतीचे 21 जून रोजी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या उदघाटनच्या कार्यक्रमा दरम्यान सभागृहातील छत पावसाच्या पाण्याने गळत होता. त्यावरून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर विरोधकांनी सभागृहाचे अर्धवट काम सुरू असताना आणि इमारतीमधील कोणत्याही मजल्यावर काम पूर्ण झाले नसताना एवढ्या लवकर उदघाटनाची घाई का केली अशा शब्दात राष्ट्रवादी, कॉंग्रेस,शिवसेना आणि मनसेकडून सडकून टीका देखील करण्यात आली होती.

त्यावरून सताधारी पक्षाकडून या सभागृहाच्या वादावर पडदा टाकण्याचे काम करीत लवकरच सभागृहाचे काम पूर्ण होईल आणि तेथून कामकाज सुरू होईल असे सांगण्यात आले.त्यानंतर तब्बल 3 महिन्यानंतर आज पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकानी सभागृहात भगवे फेटे घालून प्रवेश केला.त्यानंतर सभागृहात भारतीय संविधानाचे वाचन उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केले.त्यानंतर या कामकाजाला सुरुवात झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.