Pune : थकीत पाणीपट्टी भरण्याची महापालिकेला नोटीस  

एमपीसी न्यूज – महापालिकेने मार्च 2012 ते आंबटोबर 2018 या कालावधीतील तब्बल 224 कोटी 53 लाख एवढी पाणीपट्टी थकविली आहे. यात औद्योगिक पाणीवापराच्या फरकाची 152 कोटी 10 लाख रुपये आणि चालू वर्षांची ऑक्टोबर महिन्यापर्यंतची 72 कोटी 43 लाख रुपयांच्या पाणीपट्टीचा समावेश आहे. ही थकबाकी भरण्याबाबत महापालिकेकडून यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, अशी नोटीसच जलसंपदा विभागाने महापालिकेला बजावली आहे.
धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दिलेल्या पाण्याची गेल्या तीन वर्षाची थकबाकी तब्बल 354 कोटी रुपये होती. या रकमेवरील व्याज आणि दंड माफ करून 224 कोटी 53 लाख रुपये एवढी थकबाकी झाली आहे. तीदेखील वेळेवर भरत नसल्यास पुणे महापालिकेला आणखी किती सवलत द्यायची? असा सवाल जलसंपदा विभागाने उपस्थित केला आहे.

महापालिकेकडून वसूल झालेल्या पाणीपट्टीतूनच धरणांच्या दुरुस्तीची कामे महापालिकेकडून  पाणीपट्टी मिळाल्यानंतरच करणे शक्य होणार आहे. जलसंपदा विभागाकडून पाणीपट्टी वसुलीबाबत कडक भूमिका घेण्यात येत नसून, टप्प्याटप्प्याने रक्कम भरण्याची सवलत दिली आहे, अशी माहिती जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता मुंडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.