सोमवार, फेब्रुवारी 6, 2023

Pune : कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेचा 33 कोटी खर्च

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजविला आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने 33 कोटी 50 लाख रुपयांच्या खर्चाचे नियोजन केले आहे. यामध्ये 10 कोटी रुपये उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या हॉस्पिटल खर्चासाठी करण्यात येणार आहेत.

पुणे शहरात रोज 1500 ते 1600 चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रोज 200 च्या वर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. सध्या शहरात साडे तीन हजारांच्या पुढे कोरोना रुग्णांची संख्या गेली आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याने रुग्ण वाढते आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांसाठी विलगिकरण केंद्र व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागत आहेत. त्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. साधारण 2 हजार 500 लोक विलगीकरण कक्षात आहेत. कोरोना बाधित रुग्णांसाठी विविध सोयीसुविधा, अत्यावश्यक साहित्य खरेदी, यासाठी तब्बल 33 कोटी 50 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

तर, आगामी 5 वर्षे कोरोना संकटामुळे पुणेकरांच्या आरोग्यावर महापालिकेला निधीची तरतूद करावी लागणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतर्फे बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे दीड हजार बेड उभारणीसाठी सुरुवात केली आहे. त्यातील 500 बेड तयार आहेत. त्याची पाहणी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली.

यापूर्वी कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग हा 8 दिवसांचा होता. तो आता 13 दिवसांवर आला आहे. मे अखेरीस 10 हजार कोरोनाचे रुग्ण होणार असल्याचा अंदाज महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला होता. मात्र, सध्या या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हा आकडा आता 5 हजारांच्या आसपास जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. बालेवाडीत 3 इमारतीत हे बेड तयार करण्यात आले आहे.

Latest news
Related news