Pune News : पुणे महापालिकेच्या ‘ई मोटारी’ चार्जिंग’ सेंटर उभारले भोसरीत; अधिकाऱ्यांची दगदग 

एमपीसी न्यूज – महापालिकेने पर्यावरण पूरक ई वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. मात्र, ही वाहने चार्जिंगची व्यवस्थाच अद्याप न उभारल्याने अधिकार्‍यांसाठी भाडेतत्वावर घेतलेल्या ‘मोटारी’ चार्जींगसाठी भोसरी येथील चार्जिंग सेंटरवर न्याव्या लागत असल्याचे समोर आले आहे.

सार्वजनिक वाहतुकीसाठी ई बसेसचा वापर करणारी पीएमपीएमएल ही देशातील पहिली संस्था ठरली. सध्या महापालिकेच्या ताफ्यात अडीचशेहून अधिक ई बसेसचा ताफा आहे. नुकतेच दुसर्‍या टप्प्यामध्ये घेण्यात आलेल्या ई बसेसचे लोकार्पण 6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले. परंतू आजही चार्जिंगची व्यवस्था नसल्याने नव्या कोर्‍या 100 हून अधिक ई बसेस धूळखात उभ्या आहेत.

दुसरीकडे महापालिकेने अधिकार्‍यांसाठीही ई मोटारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 36 ई मोटारी भाडेतत्वावर घेण्यास मान्यता देण्यात आली असून त्यापैकी 8 मोटारी आठवड्यापुर्वीच महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या मोटारी सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या मोटारींची संपुर्ण बॅटरी चार्ज केल्यानंतर शहरात ही मोटार 160 कि.मी. पर्यंत धावते. सहाय्यक आयुक्तांनी या मोटारींचा वापरही सुरू केला आहे. मात्र, या मोटारी चार्जीग करण्याची व्यवस्थाच अद्याप न उभारल्याने वाहन चालकांना त्या चार्ज करण्यासाठी भोसरी एमआयडीसीतील खाजगी चार्जिंग स्टेशनवर जावे लागते. त्यामुळे येण्या-जाण्यातच सुमारे 35 कि.मी.चा प्रवास करावा लागतो.

तसेच कार्यालयीन वेळ संपल्यानंतर अधिकार्‍यांना घरी सोडून दिवसाआड वाहन चार्जिंगसाठी भोसरीला जाण्याचे कंटाळवाणे काम करावे लागत आहे. ई वाहने वापरास चालना देण्यासाठी महापालिका भवनसह उपायुक्त व क्षेत्रिय कार्यालयांच्या ठिकाणीही ई चार्जिंग स्टेशन उभारावीत, अशी मागणी होत आहे.

मात्र, मोटारी भाडेतत्वावर घेण्यात आल्या असून त्या चार्जिंगची व्यवस्था संबधित कंपनीनेच करणे बंधनकारक आहे. महापालिका ज्यावेळी स्वत:च्या ई मोटारी घेईल त्यावेळी चार्जिंग स्टेशनचा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येईल, असा प्रशासनाचा सूर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.