Pune : एक जूनपासून 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष

एमपीसी न्यूज – पावसाळा केवळ दोन आठवड्यांवर आल्याने पुणे महापालिकेतर्फे दि. 1 जूनपासून 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 39 ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू होणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीही करण्यात आल्या आहेत. पुणे महापालिका प्रशासनाच्यावतीने याबाबत माहिती देण्यात आली.  

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. काही नागरिकांना आपल्या जीवलाही मुकावे लागले होते. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक नागरिकांच्या घरांत पाणीही घुसले होते. त्यामुळे अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले होते.

गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर असा 5 महिने पावसाळा सुरू होता. आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे झोपडपट्ट्यातील, सोसायट्यातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. ड्रेनेजची अर्धवट कामे, सिमेंटचे रस्ते यामुळे पुरजन्य परिस्थिती उद्भवली होती.

यावर्षीही 100 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात मान्सून वेळेवर दाखल होणार आहे. मागील वर्षी सारखी स्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी महापालिकेतर्फे आतापासूनच दक्षता घेण्यात आली आहे. तर, दुसरीकडे नालेसफाईच्या कामानाही जोरात सुरुवात करण्यात आली आहे.

पावसाळ्यात मुळा आणि मुठा नद्यांना पूर येतो. नदीकाठची घरे पाण्याखाली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे आपत्ती कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

तर, सहकारनगर, दांडेकर पूल या परिसरात मागील वर्षी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.