Pune Municipal Election : भाजपने पद वाटपाचा धडाका लावला असताना राष्ट्रवादी शहराध्यक्ष कधी बदलणार ?

दीपक मानकर, प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, बाबुराव चांदेरे, दिलीप बराटे यांची नावे चर्चेत

एमपीसी न्यूज – आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने पद वाटप करण्याचा धडाका लावला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये मात्र शहराध्यक्ष कधी बदलणार, याची उत्सुकता लागली आहे. आज होणार, उद्या होणार, नावे पाठवली, चर्चा सुरू आहे अशीच उत्तरे देण्यात येत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी लवकरच नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे. माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, माजी उपमहापौर दीपक मानकर, दिलीप बराटे, ज्येष्ठ नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत.

राष्ट्रवादीच्या काही मातब्बर नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी शहराध्यक्ष बदलासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. विद्यमान शहराध्यक्ष चेतन तुपे हे हडपसर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. मार्च महिन्यापासूनच शहराध्यक्ष बदलण्याची चर्चा सुरू होती. कोरोनाच्या संकटामुळे ही निवड लांबणीवर पडली होती. आता मात्र लवकरच शहराध्यक्ष बदलणार असल्याची कुजबुज सुरू आहे.

अजित पवार यांची भेट घेऊन कोरोना संदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे समजते. लवकरच पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी पक्षात नवीन नेतृत्वाला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यावर अजित पवार काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.

पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. 300 कोटी रुपये खर्च करूनही कोरोना काही आटोक्यात आला नाही. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा मातब्बर नगरसेवकांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.