Pune : महापालिकेची सर्वसाधारण सभा उद्या ऑनलाइन

Municipal General Body meeting tomorrow online : एकाचवेळी 167 नगरसेवक, महापालिका अधिकारी, पत्रकार कनेक्ट होणार

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 17) ‘गुगल मीट’ प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन होणार आहे. त्याची तयारी आज रात्री पूर्ण होणार असल्याची माहिती नगरसचिव सुनील पारखी यांनी दिली.

या सभेला एकाचवेळी 167 नगरसेवक, महापालिका अधिकारी, पत्रकार कनेक्ट होणार आहेत. त्यामुळे ही सभा घेताना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने स्थानिक स्वराज संस्थेच्या बैठका ऑनलाइन घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार स्थायी समिती आणि इतर विषय समित्यांच्या बैठका ऑनलाइन घेण्यात आल्या. त्यावेळी केवळ 15 ते 20 सदस्य ऑनलाइन होते. त्या यशस्वी झाल्यात.

आता मात्र सर्वसाधारण सभेसाठी संख्या जास्त असल्याने ऑनलाइन सभा घेणे आव्हानच आहे. त्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम म्हणून माहिती तंत्रज्ञान विभागाने नवीन इमारतीच्या सभागृहातून आढावा घेतला.

या ऑनलाइन सभेत एकावेळी 2 व्यक्तीच व्यवस्थित संवाद साधू शकतात. त्यामध्ये इतर सहभागी व्यक्तींचा ऑडिओ म्यूट करणे आवश्यक आहे. मात्र, दरवेळच्या अनुभव बघता जास्तीत जास्त नगरसेवक बोलण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे या नगरसेवकांना कसे रोखणार, असा सवाल निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे इतिहासात प्रथमच उद्या महापालिकेची सभा होणार आहे. या सभेत काही विषय मंजूर होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.