Pune : महापालिकेच्या शाळांमध्ये कामगारांची राहण्याची सोय

एमपीसी न्यूज – जगभरात कोरोनाचे संकट गंभीर आहे. पुणे शहरात तर या रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात ‘लोकडाऊन’ जाहीर केले आहे. अशा परिस्थिती आपल्या मूळगावी जाऊ न शकलेल्या कामगारांची पुणे महापालिकेच्या शाळांत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

एका खोलीत केवळ 10 कामगार ठेवावेत, असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहे. या खोल्यांमध्ये सतरंजी, गादी, पिण्याचे पाणी, विद्युत, स्वच्छता, अग्निशमन, वैद्यकीय, सुरक्षा व्यवस्था देण्यास सांगण्यात आले आहे. शहरातील बेघर मजूर, कामगारांना शाळांमध्ये आणण्याची व्यवस्था उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे देण्यात आली आहे.

या कामगारांच्या जेवणाची व्यवस्था स्वयंसेवी संस्था किंवा पुणे महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. या कामगारांची माहिती संबंधित पोलीस स्टेशनमध्ये देण्यासही सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये या कामगारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.