Pune : लॉकडाऊन कालावधीत महापालिकेच्या खास ‘हेल्पलाईन’

एमपीसी न्यूज – वेगाने वाढणाऱ्या करोना व्हायरसच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी या संदर्भातील खबरदारी म्हणून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मात्र, या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. या सेवा मिळविण्यात नागरिकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने खास हेल्पलाईन सुरू केल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.

करोना व्हायरसमुळे सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत पुणेकर नागरिक अत्यावश्यक सेवांपासून वंचित राहू नयेत याची खबरदारी पुणे महापालिका घेत आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत अन्न, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंची गरज नागरिकांना भासू शकते. तसेच आरोग्याच्या दृष्टीने काही वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत आपल्या भागातील संबंधित सेवा उपलब्ध नसल्यास नागरिकांना त्या सेवा कुठे उपलब्ध होतील याबाबतची माहिती देणे तसेच त्या सेवा उपलब्ध करून देण्यात आवश्यक ती मदत प्रशासकीय पातळीवर केली जाईल अशी ग्वाही, अग्रवाल यांनी दिली.

या अनुषंगाने जीवनावश्यक सेवांबाबत मदत हवी असल्यास नागरिकांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

020-25506800, 020-25506801, 020-25506802 , 020-25506803, 020-25501269.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.