Pune Murder News : दत्तवाडीतील गुंड अक्षय किरतकिरवेचा खून करणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज – दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील म्हात्रे पुलाजवळ सराईत गुंड अक्षय किरतकिरवे (वय 25) याचा रविवारी सायंकाळी कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला होता. खून करून पसार झालेल्या चार जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

निखिल बाळु बोत्रे, सुरज संजय बोत्रे, प्रविण गणपत गाडे व अमरदिप मुकुंद भालेराव अशी अटक केलेल्या चार जणांची नावे आहेत. याप्रकरणी मृत अक्षयचा भाऊ ओंकार याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अक्षय हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी तो आपली तडीपारी संपवून म्हणून शहरात परत आला होता. रविवारी सायंकाळच्या सुमारास तो पुण्यातील म्हात्रे ब्रिज परिसरातून जात असताना आरोपींनी त्याला गाठले आणि जुन्या वादातून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्याचा निर्घृण खुन केला. त्यानंतर आरोपींनी जमलेल्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणाचा समांतर तपास करीत असताना युनिट तीनचे कर्मचारी राजेंद्र मारणे यांना यातील आरोपी मुळशीतील बापुजी बुवा खिंड, देवकरवाडी येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने या ठिकाणी जाऊन त्या चौघांना अटक केली.

मृत अक्षय आणि आरोपी निखिल बोत्रे व प्रवीण गाडे यांचे काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. त्यावेळी अक्षय ने या दोघांना भर चौकात मारहाण केली होती. त्याचवेळी आरोपीने तू आम्हाला चौकात मारले आहेस आम्ही तुला संपवून टाकू अशी धमकी दिली होती. अशीच धमकी आरोपींनी प्रत्यक्षात उतरवत रविवारी सायंकाळच्या सुमारास अक्षयचा खून केला.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता चवरे, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार दीपक मते, एकनाथ कंधारे, राजेंद्र झुंजुरके, हनुमंत गायकवाड, सुजीत पवार, संदिप तळेकर, प्रकाश कट्टे, दिपक क्षिरसागर, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.