Pune Murder News : खून करून पसार झालेल्या आरोपीला पाच तासात बेड्या

एमपीसीन्यूज : दुचाकीला दगड मारल्याचा रागातून डोक्यात दगड घालून एका 45 वर्षीय व्यक्तीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या पाच तासांत अटक केली. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी रात्री हा प्रकार घडला होता.

ज्ञानोबा गंगाधर धनगे (वय 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी अतिष सुरेश वायदंडे (वय 23) याला पोलिसांनी अटक केली. युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी ही कामगिरी केली.

याबाबत अधिक माहिती अशी, कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्ञानोबा धनगे यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला होता.

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट पाचचे कर्मचारीही या गुन्ह्याचा तपास करत होते.

दरम्यान या गुन्ह्याचा तांत्रिक तपास सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना अतिश वायदंडे यांनी हा खून केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली.

किरकोळ वादातून हा खून करण्यात आला. आरोपी आणि मयत हे एकमेकांना पूर्वीपासूनच ओळखत होते. सोमवारी रात्री ही ते एकत्रच होते. मध्य रात्री अडीचच्या सुमारास त्यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादातून मयत ज्ञानोबा धनगे याने अतिश वायदंडे याच्या दुचाकीला दगड मारला.

याचाच राग आल्याने अतिश याने जवळ पडलेला मोठा दगड उचलून धनगे याच्या डोक्यात मारला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने धनगे यांचा जागीच मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. परंतु, पोलिसांनी पाच तासात त्याला अटक करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस कर्मचारी मोराळे, काळभोर, जोगदंड, शिवले, दळवी, खंदारे, शेगर यांच्या टीमने केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.