Pune : पुणे महापालिकेच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ, तर उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे अभ्यासू नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांची तर, उपमहापौपदी नगरसेविका सरस्वती शेंडगे यांची आज, शुक्रवारी बहुमतांनी निवड करण्यात आली.

राष्ट्रवादीतर्फे महापौरपदासाठी जेष्ठ नगरसेवक प्रकाश कदम, तर महापौर पदासाठी काँगेसतर्फे नगरसेविका चांदबी नदाफ शेख यांना संधी देण्यात आली होती. मुरलीधर मोहोळ यांना 97 मते पडली तर, काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेनेचे उमेदवार प्रकाश कदम यांना 59 मते मिळाली. या निवडणुकीत मनसेचे दोन नगरसेवक तटस्थ होते. पाच नगरसेवक अनुपस्थित होते. महापालिकेत भाजपचे 99 नगरसेवक आहेत. त्यांचे दोन नगरसेवक आज अनुपस्थित राहिले.

भाजप नगरसेवकांनी भगवे फेटे घालून भाजपचे चिन्ह असलेले उपरणे गळ्यात घातले होते. आरपीआय ( आठवले गट) च्या नगरसेवकांनी फेटा आणि गळ्यात रामदास आठवले यांचे चित्र असलेले उपरणे घातले होते. पीठासीन अधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर होते.

तुतारी वाजवून नगरसेवकांचे स्वागत करण्यात आले. पक्षाच्या आदेशानुसार मनसे तटस्थ राहणार असल्याचे गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले.
महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीला शिवसेनेने साथ दिल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. राज्यातील सत्ता स्थापनेच्या निर्णयाआधीच पुण्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता.

भाजपने मुरलीधर मोहोळ यांना महापौर आणि सरस्वती शेंडगे यांना प्रत्येकी 1 वर्षाचा कालावधी दिला आहे. मोहोळ यांनी कोथरूड मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्याचीच परतफेड म्हणून मोहोळ यांना महापौर पदाची संधी देण्यात आल्याची कुजबुज आहे. महापौर आणि उपमहापौरपदासाठी मतदान करताना आपले नाव, प्रभागाचे नाव, उभे राहून, हात वर करून मतदान घेण्यात आले.

मोहोळ यांची निवड झाल्यानंतर खासदार गिरीश बापट आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांचा सत्कार केला. पुणे शहर भाजपचे माजी अध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. मोहोळ यांच्या कुटुंबीयांनी यावेळी त्यांचे औक्षण केले. महापालिका परिसरात ढोल – ताशांच्या आवाजात निवडीचे स्वागत करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी मोहोळ यांच्या निवडीचे फलेक्स लावण्यात आले होते.

मोहोळ यांनी पुण्यातील खालकर आणि निंबाळकर तालमीत मल्लविद्येचे धडे घेतले. कोल्हापूरच्या शासकीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रात सहा वर्ष सराव केला.    राष्ट्रीय आणि विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांचे वडील किसनराव मोहोळ, चुलते रामचंद्र मोहोळ हे देखील नामवंत पहिलवान म्हणून ओळखले जातात. मोहोळ यांचे मोठे बंधू प्रभाकर आणि चुलत बंधू श्रीधर, गणेश हे देखील कुस्तीपटू आहेत.

सरस्वती शेंडगे यांना 97 तर, चांदबी हाजी नदाफ यांना 59 मते

पुणे महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार सरस्वती शेंडगे यांना 97 तर, काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाशिव आघाडीच्या उमेदवार चांदबी हाजी नदाफ यांना 59 मते मिळाली. शेंडगे यांची बहुमतांनी उपमहापौरपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडणुकीतही मनसेचे 2 नगरसेवक तटस्थ होते. शेंडगे यांची निवड जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.