Pune : पुणे फेस्टिव्हल’मधील आंतरराष्ट्रीय मुशायरा कार्यक्रमास जोरदार प्रतिसाद

'अवामी महाज' आणि इनामदार हॉस्पिटलकडून आयोजन

एमपीसी न्यूज- ‘पुणे फेस्टिव्हल ‘ मध्ये शनिवारी (दि. ६) रात्री आयोजित करण्यात आलेल्या उर्दू ,हिंदी शेरोशायरीचा आंतरराष्ट्रीय मुशायरा कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला. मोहरम आणि गणेशोत्सवाच्या महिन्यात झालेल्या ‘ पुणे फेस्टिव्हल ‘ कार्यक्रमात गंगा -जमुना तहजीबचे, हिंदू -मुस्लिम सलोख्याच्या परंपरेचे दर्शन घडले आणि मुशायरा संस्मरणीय ठरला.

‘अवामी महाज’ सामाजिक संस्था आणि इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री दहा वाजता हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा केंद्र(स्वारगेट) येथे झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे माजी अल्पसंख्यांक विकास मंत्री आरिफ नसीम खान यांनी केले. ‘अवामी महाज’चे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सभागृहात ‘ पुणे फेस्टिव्हल’ चे संस्थापक सुरेश कलमाडी, एस ए इनामदार, डॉ. सतीश देसाई, अभय छाजेड, सुरेश (काका) धर्मावत, वाहिद बियाबानी, इम्तीयाझ मुल्ला, डॉ. मुश्ताक मुकादम, लतीफ मगदूम उपस्थित होते.

या कार्यक्रमात मोहमद अरिफ नसीम खान यांच्या हस्ते सांगलीच्या पुरात ६ दिवस ३०० जणांना वाचविणारे मच्छीमार बंधू एजाझ अहमद पठाण, हसन अब्दुल पठाण यांना ‘ फक्र_ ए- महाराष्ट्र ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे

अरिफ नसीम खान म्हणाले, ” सर्व धर्मसमभाव, एकात्मतेला नजर लागली आहे. त्याबद्दल विचार करायला कोणाला वेळ नाही, ही चिंतेची बाब आहे. या देशाच्या हिंदू -मुस्लिमांमध्ये दुरी उभी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांविरूध्द लढा देण्याची गरज आहे. देशाला बरबाद करणाऱ्यांना सरदार म्हणता येणार नाही” असे ते म्हणाले.

पॉप्युलर मेरठी (मीरत),मंझर भोपाली(भोपाळ),इक्बाल अशर(दिल्ली ),अफरोज आलम(दुबई),अतुल अजनबी (ग्वाल्हेर),रियाझ सागर (मुझफ्फर नगर ), शाहीद अदिली (हैद्राबाद),शाईस्ता सना(कानपूर),डॉ मुमताज मुनव्वर (पुणे), अंजली अदा (काश्मीर),रेहाना शाहीन (अलीगड),शर्फ नानपर्वी(दिल्ली) हे शायर कवी सहभागी झाले. इक्बाल अन्सारी, डॉ मेहताब आलम (भोपाळ) यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ परवेझ इनामदार, डॉ मुश्ताक मुकादम, वाहिद बियाबानी, इम्तियाझ मुल्ला, प्रा. उझ्मा तस्नीम यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.