Pune : मातोश्री वृद्धाश्रमात ‘भूपाळी ते भैरवी’ कार्यक्रम उत्साहात

एमपीसी न्यूज- तुझ्या कांतीसम रक्तपताका… उठी श्रीरामा.. या भुपाळींनी सुरु झालेला सुरेल कार्यक्रम मर्मबंधातली ठेव ही.. मम आत्मा गमला.. मन मंदिरा तेजाने.. क्षणभर उघड नयन देवा.. कानडा राजा पंढरीचा.. जिथे सागरा धरणी मिळते… हृदयी प्रीत जागते… जीवनात ही घडी यांसारख्या लोकप्रिय अवीट चालीच्या गाण्यांनी उत्तरोत्तर रंगत गेला. निमित्त होते मातोश्री वृद्धाश्रमात रमा क्रिएशन्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘भूपाळी ते भैरवी’ या शास्त्रीय आणि सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे.

ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका स्मिता महाबळ यांनी राग मुलतानीने कार्यक्रमाची सुरुवात केली. या रागात विलंबित तीनतालमध्ये मानत नाही जीयरा मोरा तुमबीन … ही बंदिश सादर केली. त्यानंतर नाट्यसंगीत, भक्ती गीत, अभंग, भावगीत असे भारतीय संगीताचे एकाहून एक सरस प्रकार सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

कानडा राजा पंढरीचा.. ला वन्स मोर मिळाला. जातो माघारी पंढरीनाथा या भैरवीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. प्रत्येक सादरीकरणाला रसिकांची वाहावा मिळत होती. डी. डी. कुलकर्णी यांनी तबल्यावर, जयंत साने यांनी हार्मोनियम, सुनीता कुलकर्णी यांनी तानपुरा, तर स्नेहा जोशी यांनी टाळ आणि खंजिरी वर साथसंगत केली. कार्यक्रमानंतर वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना खाऊ आणि तिळगुळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन अमृता कानविंदे आणि निवेदन रमा कानविंदे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.