Pune : ‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रमातून उलगडणार अरुण दाते आणि 14 कवींचे नाते

एमपीसी न्यूज- गायक आणि कवीचे नाते हे अतूट असते. कवीच्या लिखित अभिव्यक्तीला गायक आपला सुरांचा साज चढवतो आणि ही कलाकृती रसिकांच्या मनावर राज्य करते. अशीच काहीशी अनुभूती ज्येष्ठ गायक अरुण दाते यांनी गायलेल्या गीतांमधून येते. म्हणूनच अरुण दाते व त्यांनी गायलेल्या गीतांचे गीतकार/कवी यांची सांगड घालत एक अनोख्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम ऐकण्याची संधी ऑरेंज डायबेटीस फाउंडेशनच्या डॉ. शैलजा काळे आयोजित ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमात मिळणार आहे. शनिवारी (दि. 5) सायंकाळी साडेपाच वाजता टिळक स्मारक मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

यात १४ गीतकारांची अरुण दाते यांनी गायलेली गाणी सादर होणार असून त्याच बरोबर ७ कवींच्या कवितांचे वाचन होणार आहे. ‘एक झाड आहे याचे माझे नाते’ ही शांत शेळके यांची कविता, ‘कळले आता घराघरांतून नागमोडीचा जिना कशाला’ ही वसंत बापट यांची, तर कुसुमाग्रज यांची ‘ओळखलत का सर मला’, सौमित्रची ‘त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो’, शंकर वैद्य यांची ‘नदीच्या काठी आपण बसलो होतो’, मंगेश पाडगावकर यांची ‘मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबत का?’ तसेच सुधीर मोघे यांची ‘क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात’ अशा कवितांचा यावेळी आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे अरुण दाते यांच्या गाजलेल्या गाण्यांबरोबरच काही उत्कृष्ट कवितांचा आस्वाद देखील रसिकांना घेता येणार आहे.

कार्यक्रमात प्रसिद्ध गायक व संगीतकार मंदार आपटे, गायिका श्रुती जोशी यांचा सहभाग असून स्मिता लाटे या काव्यवाचन करणार आहेत. याबरोबरच अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते स्वत: आपल्या वडिलांच्या कारकीर्दीतील रसिकांनी सहसा न ऐकलेल्या आठवणींचा खजिना उपस्थितांसमोर उलगडून दाखवतील. या कार्यक्रमाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दृकश्राव्य माध्यमातून (ऑडिओ व्हिज्युअल) स्वत: अरुण दाते यांचा असणारा सहभाग. कार्यक्रमात सहभागी असणा-या कलाकारांपैकी मंदार आपटे हे ‘राधा ही बावरी’ या मालिकेबरोबरच ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाचे संगीतकार आणि गायक आहेत. तर श्रुती जोशी या अनुराधा कुबेर यांच्या शिष्या असून ‘व्हॉट्स अप लग्न’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे.

कार्यक्रमात प्रसन्न बाम (हार्मोनियम), अमित कुंटे (तबला), केदार परांजपे (कि-बोर्ड), ऋतुराज कोरे (ऱ्हीदम मशीन), प्रशांत कांबळे (ध्वनी व्यवस्था) हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे. प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.