Pune : मुस्लिमांनी घरीच नमाज पठण करावे – डॉ. पी. ए. इनामदार

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू साथीच्या आणि ‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर ‘सोशल डिस्टंन्सिंग’ ठेवणे आवश्यक असून, मुस्लिमांनी मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण न करता घरीच वैयक्तिक पातळीवर नमाज पठण करावे, असे आवाहन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पीए इनामदार यांनी केले.

आझम कॅम्पस शैक्षणिक परिवार आणि हाजी गुलाम महंमद आझम ट्रस्टच्या वतीने गरीब आणि गरजू वर्गातील सर्वधर्मीय 200 कुटुंबांना 15 दिवसांचे जीवनोपयोगी साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात सर्व मशिदींमधील, सोसायटीमधील सामूहिक नमाज पठण थांबविण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांच्या मदतीने आपण प्रयत्न करून सामूहिक पठण आताच्या परिस्थितीत योग्य ठरणार नसल्याचे डॉ. इनामदार यांनी सांगितले.

तसेच दिल्ली निजामुद्दीन येथील तबलिग जमात एकत्रिकरणाची रीतसर परवानगी आयोजकांकडे होती. लॉकडाऊन आवाहनानंतर आयोजकांनी तेथे जमलेल्या मुस्लिम भाविकांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाशी लेखी पत्रव्यवहार केला होता.

मात्र ,धोरणात स्पष्टता नसल्याने भाविकांना तेथून बाहेर पडण्याविषयी प्रशासनकडून सूचना मिळू शकल्या नाहीत. कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी संयोजक पोलीस आणि प्रशासनाच्या संपर्कात होते. त्याचे सर्व पुरावेही संयोजकांनी दिले आहेत.

त्यामुळे निजामुद्दीन तबलिग जमात बाबत गैरसमज पसरवू नये व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळत आहेत. सर्वांनी या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन डॉ. इनामदार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.