Pune News: पुण्यातील नामांकित ज्वेलर्सना गंडवणारी महिला जेरबंद, चोरीच्या बारा घटना उघडकीस

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील नामांकित ज्वेलर्स मध्ये प्रवेश करून सोन्याचे दागिने घेण्याचा बहाण्याने चोरी करणाऱ्या एका सराईत महिला हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. या महिलेने पुणे शहरात केलेल्या बारा चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तिच्याकडून सव्वा सहा लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. पुनम परमेश्वर देवकर (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या महिलेची नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपसर येथील चंदुकाका सराफ अँड सन्स या सराफा दुकानातून 23 नोव्हेंबर रोजी एका महिलेने लक्ष विचलित करून सोन्याची अंगठी चोरून नेली होती. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शहरातील पु ना गाडगीळ, रांका ज्वेलर्स, मलबार, ब्लू स्टोन अशा नामांकित सराफा दुकानांमध्ये देखील अशा प्रकारचे गुन्हे घडले होते. त्या सर्व दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला त्यामध्ये दिसून आली.

हडपसर पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारे तपासाला सुरुवात केली. यामध्ये दिसणारी महिला हडपसर वरून दिल्ली वाडीपर्यंत गेल्याचे सीसीटीव्हीचा तपासणीत दिसून आले. दरम्यान गुरुवारी हडपसर पोलिसांचा तपास पथकातील पोलिस कर्मचारी सराफा दुकान परिसरात गस्त घालत असताना त्यांना संशयित महिला दिसून आली. त्यांनी या महिलेला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता ती गडबडून गेली. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्या कडून बारा चोरीच्या घटना उघडकीस आणले असून सहा लाख 23 हजार रुपये किमतीच्या 12 सोण्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.