Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार समोरासमोर ?

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुण्यात भेट होण्याची शक्यता आहे. देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी दोन दिवसांसाठी पुण्यात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ठाकरे हजर राहणार असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे, असा राजशिष्टाचार आहे. त्यामुळे ठाकरे विमानत‌ळावर मोदी यांचे स्वागत करणार का ? याकडे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. पोलीस महासंचालकाची परिषद दि. 6 ते 8 डिसेंबर दरम्यान पुणे शहरात होणार आहे. या परिषदेसाठी मोदी येणार असून ते मुक्कामी राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेना – भाजपची युती होती. निकाल आल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी भाजपकडे केली. मात्र, भाजपने ही मागणी धुडकावून लावली.

त्यामुळे शिवसेनेने काँगेस – राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत राज्यात सत्ता स्थापन केली. स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. या महाविकास आघाडी सरकारच्या पार्श्वभूमीवरच मोदी पुण्यात येत आहेत. तेव्हा उद्धव आणि मोदी यांच्यात काय चर्चा होणार, याची उत्सुकता लागली आहे. पाषाणमधील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत ही परिषद होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.