मंगळवार, जानेवारी 31, 2023

Chakan News : चाकण मध्ये ‘देव तारी त्याला कोण मारी’ चा आला प्रत्यय

एमपीसी न्यूज :  पुणे नाशिक महामार्गावर चाकण येथील आंबेठाण चौकाच्या जवळील उड्डाण पुलावर एका थरारक अपघात घडल्याची घटना आज दुपारी घडली.(Chakan News) अवजड ट्रक खाली आलेली तरुणी यातून बचावली ; शिवाय याच अवजड ट्रकला मागून धडकलेल्या मोटारीचा चालक देखील सुदैवाने बचावला. भीषण अपघात झाला पण मृत्यूच्या दाढेतून दोघे बचावल्याने  ‘देव तारी त्याला कोण मारी’ चा  प्रत्यय आल्याची चर्चा येथे दिवसभर सुरु होती.

या बाबतचे अधिक वृत्त असे कि,  रस्ता ओलांडत असलेल्या तरुणीला खेड बाजूकडे जाणाऱ्या अवजड वाहनाने जबरदस्त धडक दिली. तरुणीला वाचवण्याच्या प्रयत्नात अवजड वाहन चालकाने आपले वाहन ब्रेक दाबून थेट रस्त्याच्या लगत असलेल्या दुभाजकावर घातले. नेमक्या त्याच वेळी पाठीमागून आलेली स्विफ्ट मोटार या अवजड ट्रकवर पाठीमागून आदळली. अवजड वाहनाच्या धडकेने संबंधित तरुणी या अवजड वाहनाखाली जाऊन अडकली. तरुणीचे केस अवजड ट्रकच्या चाकाखाली अडकल्याने जखमी तरुणीला बाहेर काढता येईना. अखेर अवजड वाहनाच्या चाकाखाली अडकलेले तरुणीचे केस कात्रीने कापून तिला बाहेर काढण्यात आले.

Pimpri-Chinchwad firing : पिंपरी- चिंचवड शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी गोळीबार, हवेत झाडल्या 8 गोळ्या

जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात पाठवण्यात आले. स्विफ्ट मोटारीच्या समोरील भागाचा चक्काचूर होऊनही चालक मात्र अपघातातून बचावला. दरम्यान अपघातानंतर पळून जाणाऱ्या अवजड ट्रक चालकाला पाठलाग करून चाकण मधील सामाजिक कार्यकर्ते विशाल बारवकर यांनी पाठलाग (Chakan News) करून पकडले व वाहतूक पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान अपघातातील तरुणीची प्रकृती सायंकाळ पर्यंत स्थिर असल्याचे समजते. या महामार्गावरील सततचे अपघात आणि कोंडी यामुळे रस्त्याच्या लालफितीत अडकलेल्या कामाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Latest news
Related news