Chakan News : पुणे – नाशिक महामार्गाचे काम लवकरच सुरु होणार; सुधारित प्रस्तावाला मान्यता

एमपीसी न्यूज – पुणे नाशिक महामार्गावर 1 लाख पिसीयू ( पर कार युनिट ) वाहतूक आहे. त्यात अवजड वाहतूक प्रचंड आहे. मागील काही वर्षात या भागाचा शासनाच्या विकास प्रकल्पांनी मोठा विकास झाला; मात्र संसाधने त्या तुलनेत झाली नाहीत. त्याला अनेक कारणे आहे. मागील दीड वर्षात या भागातील रस्त्यांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत. मोशी ते चांडोली दरम्यानच्या रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया झालेली असून सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याने लवकर या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव आयएएस अधिकारी संकेत भोंडवे यांनी दिली.

चाकण एमआयडीसी मध्ये शुक्रवारी (दि. 26) फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वाहतूक कोंडी आणि खेड तालुक्यातून हद्दपार झालेले विमानतळ, इंडस्ट्रीअल टाऊनशिप , कायदा सुव्यवस्था आणि एमआयडीसी मधील विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव आयएएस अधिकारी संकेत भोंडवे आणि शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उद्योजकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

कार्यक्रम प्रसंगी उद्योजकांना माहिती देताना भोंडवे म्हणाले, पुणे नाशिक महामार्गाच्या या भागातील कामासाठी जवळपास 50 करोड रुपये प्रती कि.मी.साठी खर्च येणार आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याचे काम सुद्धा लवकरच सुरु होणार आहे.

पुढे भोंडवे म्हणाले, या रस्त्यावरील वाहतुकीचा प्रचंड ताण पाहता ठिकठिकाणी भुयारी मार्ग, ओव्हरपास , तसेच नद्यांवर मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. चाकण मधील सध्या उड्डाणपूल काढून संपूर्ण नवे अद्ययावत उड्डाणपूल निर्माण केले जाणार आहेत. पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यात 34 लाख रोजगार निर्मिती झालेली असल्याने त्या प्रकारच्या समस्या आणि त्यांचे निराकरण सध्या करावे लागत असल्याचेही भोंडवे यावेळी म्हणाले.

यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे, जिल्हा उद्योग केंद्राचे सदाशिव सुरवसे, वरिष्ठ पोलीस अधिकारी मंचक इप्पर, एफसीआयचे दिलीप बटवाल आदींसह विविध कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सुधारित प्रस्तावाला मान्यता : भोंडवे 

नाशिक-पुणे महामार्गाचे काम हे विविध टप्प्यांमध्ये केले जात आहे. त्यात नाशिक ते सिन्नर, सिन्नर ते संगमनेर, संगमनेर ते खेड, खेड ते पुणे या टप्प्यांचा समावेश आहे. अखेर मोशी ते खेड या दरम्यानच्या महामार्गाच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. आता प्रत्यक्ष महामार्गाच्या कामाला वेगाने चालना मिळणार असल्याचे केंद्रीय प्रशासकीय अधिकारी संकेत भोंडवे यांनी सांगितले.

एमआयडीसी मध्ये संघटीत गुन्हेगारी : खा. डॉ. अमोल कोल्हे

चाकण एमआयडीसी मध्ये गुन्हेगारीच्या समस्या अद्यापही आहेत. संघटीत गुन्हेगारी कारवाया थोपवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. काही प्रमाणात या गुन्हेगारीवर चाप लावण्यात आलेला असला तरीही गुन्हेगारी समूळ उखडून टाकण्याची गरज असल्याचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले. या भागात प्रस्तावित असलेल्या विकास कामांच्या बाबत देखील त्यांनी यावेळी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.