Pune : अन् निसर्ग हसला…

राजन वडके

एमपीसी न्यूज – आज 22 एप्रिल, जागतिक वसुंधरा दिन. वसुंधरा म्हणजे अखिल जीवसृष्टीची जीवनदायिनी. तिच्या रक्षणासाठीचा हा दिवस.वृक्षारोपण, नदी स्वच्छता यांसह पर्यावरणाबाबत जनजागृतीच्या विविध उपक्रमांद्वारे हा दिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. पण, यंदाचे वर्ष करोना सारख्या महामारीचे संकट घेऊनच आले. या संकटामुळे जगासमोर प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. लाखो माणसांना जीव गमवावा लागलाय तर अनेकजण मरणाच्या दारात उभे असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे साऱ्या जगातील लोकांना घरात बसावे लागले आहे. खरतर जग धांबलय.

कोरोना विषाणूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या चीन वर जगभरातून टीका होतेय. हे जैविक युद्ध असल्याची शंकाही जागतिक नेते, अभ्यासक व्यक्त करत आहेत. अनेक तर्क लढवले जात आहेत, मतं व्यक्त केली जात आहेत. न्यूज चॅनलवर दिवसभर कोरोनाच्या बातम्या, रोगाची लागण झालेल्यांची आणि मृतांची वाढती आकडेवारी.

या बातम्यांमुळे माणूस सुन्न झालाय. कोरोनाचा प्रसार कसा सुरू झाला?, याला जबाबदार कोण? याबाबत जागतिक स्तरावरील नेते आरोपप्रत्यारोप करत आहेत. या सर्वांतून काय निष्पन्न होईल ते आगामी काळच सांगेल. कोरोनाचे कारण काहीही असो,

पण एक मात्र खरं, माणूस चुकला की निसर्ग त्याला क्षमा करत नाही. या पृथ्वीतलावावरील वनराई, पशु, पक्षी त्यांचा अधिकार सिद्ध करतात. कोरोनामुळे अपार मनुष्यहानी होत आहे. आर्थिक फटका बसला आहे. माणूस घरातच थांबलाय पण निसर्ग आनंदलायं.

होय, याचा अनुभव आपण सर्व जण घेत आहोत. घरात स्वताःला कोंडून. अलार्म न लावताही पक्षांच्या किलबिलाटाने पहाटेच जाग येऊ लागलीये. चिमण्यांची कलकल सुखावतेय, कोकिळेची कुहू-कुहू साद घालतेय, इतरही अनेक पक्षांचा गुंजारव कानांत घुमू लागतोय, अशा पक्षीगीतांचा आनंद घेत असतनाच सकाळी खिडकीतून येणारी थंड वाऱ्याची झुळूक उल्हासित करतेय.

या प्रसन्न वातावरणाची अनुभूती घेत खिडकीतून बाहेर पाहिल्यावर आपल्या डोक्यावरील तुरा मिरवत आनंदाने गुंजन करणारा बुलबुल, गोलगोल फिरणारा कबुतरांचा थवा, एरवी पिंजराबंद असलेले हिरवे गर्द रंगांचा आणि त्यांच्या लाल चोचीतून शीळ घालत बिनधास्थ फिरणारा पोपटांचा थवा हे मनोहरी दृष्य मन प्रफुल्लित करते. आहा, अशी सुंदर सकाळ गेल्या काही दिवसांपासून आपण अनुभवतोय. जल, हवा शुद्ध झाल्याचं जाणवतेय, सर्वच गोंगाट बंद झाल्याने मनःशांती मिळतेय.काहीतरी हरवलेलं सापडल्याचा आनंद होतोय. आपण आनंदच हरवून बसलोय.

कोरोना हे निमित्त झालं, पण पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांच्या विरोधात माणसाने काही केले किंवा नैसर्गिक नियमांचे उल्लंघन केले की त्याची फळे भोगावी लागतात, याची जाणीव निसर्गाने आपल्याला करून दिली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आणि या वसुंधरेवर आपला हक्क गाजवण्यासाठी माणूस सातत्याने निसर्गावर अत्याचार करत आला आहे.

कोरोना हे एक प्रकारे त्याचेच फळ आहे का? माहित नाही, पण माणसाच्या चुकीमुळे हरवलेला निसर्गानुभूतिचा. आनंद टिकवायचा असेल तर, या वसुंधरेला वाचवायलाचं हवं. अन्यथा निसर्गाचा प्रकोप अटळ आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.