Pune : अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ न घेतल्याने पुण्यात शांतता

एमपीसी न्यूज – काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवतीर्थावर शपथही घेतली. मात्र, अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ न घेतल्याने पुण्यात राष्ट्रवादीच्या गोटात शांततेचे वातावरण आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. काँगेस आणि शिवसेनेने या महाविकास आघाडी सरकारचे धुमधडाक्यात स्वागत केले आहे. काँगेसतर्फे मंत्री पदासाठी तीनवेळा निवडून आलेल्या संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे. इंदापूर मतदारसंघातून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केलेले दत्तात्रय भरणे यांनाही मंत्री केले जाऊ शकते. शिवसेनेचा पुणे शहर आणि जिल्ह्यात एकही आमदार नाही. त्यामुळे मंत्रिपदाची नेमकी कोणाला संधी मिळणार ? याची उत्सुकता लागली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असले तरी दबदबा मात्र राष्ट्रवादीचच राहणार असल्याची कुजबुज आहे. पालकमंत्री म्हणून अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्याही नावावर चर्चा सुरू आहे. पाटील यांना विधानसभेचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.