Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या भाजपचा राष्ट्रवादीतर्फे निषेध

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील आणि खासदर वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निषेधाच्या घोषणा देऊन लाल महाल चौक सोमवारी दुपारी दणाणून सोडला.

युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेक्षा कोणीही मोठा नाही.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना कधीही होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करण्यापेक्षा महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जे स्वराज्य निर्माण केले त्याचे अनुकरण भारतीय जनता पक्षाने करावे, असे खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या.

शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे पाटील म्हणाले, राजमाता जिजाऊसाहेब यांच्या जयंतीदिनी आज के शिवाजी- नरेंद्र मोदी हे पुस्तक प्रकाशित करणे म्हणजे भाजपचे हे एक कटकारस्थान आहे. यापूर्वी सुध्दा अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी असे कृत्य केले आहे, कोण हा गोयल त्याला मराठा वीरांची आणि या मराठी मातीच्या थोर पराक्रमाची काय माहिती हा कोणी इतिहास तज्ञ आहे का? त्यामुळे अशा विकृत लोकांमुळे आज सर्व शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

यावेळी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपें, रविंद्र माळवदकर, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, नगरसेवक वनराज आंदेकर कदम, राकेश कामठे, प्रदीप देशमुख, स्वाती पोकळे, महेश हांडे, विजयबापू डाकले, स्वप्नील दुधाने, प्रमोद शिंदे, विशाल मोरे,संतोष नांगरे,अजीम गुडाकुवाला,गणेश नलावडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.