Pune : राष्ट्रवादीचे नगरसेवक गफूरभाई पठाण यांनी कोरम विचारल्याने खास सभा थांबवली

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे नगरसेवक गफूरभाई पठाण यांनी मंगळवारी रात्री कोरम विचारल्याने महापालिकेची अंदाजपत्रकावरील खास सभा काही काळासाठी थांबवली.

नगरसेवक योगेश ससाणे यांचे भाषण सुरू असताना सर्वोपक्षीय गटनेते सभागृहाबाहेर होते. गफूरभाई पठाण यांनी अचानकपणे उठून सभेसाठी आवश्यक कोरम आहे का?, अशी विचारणा केली. त्यामुळे महापौरांबरोबरच सर्वोपक्षीय गटनेत्यांची पळापळ सुरू झाली. अखेर सर्वांनी सभागृहात हजेरी लावून गफूरभाई पठाण यांची समजूत घातली.

योगेश ससाणे यांचेही लांबलेले भाषण थांबविण्याची विनंती केली. त्यांनतर ही सभा बुधवारी (दि. 4 मार्च) सकाळी 11 वा. पर्यंत तहकूब करण्यात आली. दरम्यान, कोरममुळे सभा तहकूब करण्यात आली नाही. कोरम घेण्याचे आदेश महापौर देऊ शकतात, अशी माहिती नगरसचिव सुनील पारखी यांनी दिली.

योगेश ससाणे म्हणाले, अडीच हजार कोटींच्या तुटीचा हा अर्थसंकल्प आहे. वास्तवतेला धरणारे हे बजेट नाही. उपनगरांना निधी काही दिला जात नाही. आम्हाला 2 कोटी आणि सत्ताधाऱ्यांना 5 कोटी हा दुजाभाव का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मोबाईल कंपन्यांची 946 कोटी थकबाकी आहे. त्यांचे बिल थकल्यावर ते थांबत नाही, मग आपण का थांबतो, नवीन गावांमध्ये काही नियमांमुळे विकास थांबलाय, सोलापूर रस्त्यासाठी निधी नाही. हडपसर सारख्या उपनगराकडे लक्ष द्या, सोलापूर बीआरटीसाठी सातत्याने भांडतोय, आता मेट्रोचे भूत आले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

रुपाली धाडवे म्हणाल्या, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी वास्तववादी बजेट सादर केले. वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी 10 रुपयांत बस प्रवास ही मोठी फायद्याची योजना आहे. थकबाकी मोठ्या प्रमाणात असून, ती वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेविका गायत्री खडके, सोनाली लांडगे, माधुरी सहस्त्रबुद्धे, पल्लवी जावळे यांनीही आपले मत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.