Pune News : सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजपचा शहर राष्ट्रवादीतर्फे निषेध

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने व कंपन्या आणि अजितदादांच्या नातेवाईकांच्या कंपन्या व कार्यालयांवर इन्कम टॅक्सने टाकलेले छापे हे केंद्रातील सत्ताधारी भाजपचे कारस्थान आहे. केवळ प्रतिमा मलीन करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करीत असलेल्या भाजपच्या या कृतीचा गुरुवारी शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. पक्षाच्या कार्यकारिणीत हा निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची दुसरी कार्यकारिणी बैठक गुरुवारी लोकमान्य टिळक सभागृह येथे पार पडली. या बैठकीस मोठ्या संख्यने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. अंकुशअण्णा काकडे यांनी सत्तेचा गैरवापर करून केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून राज्यातील नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या निषेधाचा ठराव मांडला. त्यास मा. श्रीकांत शिरोळे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव कार्यकारिणीत एकमुखाने मंजूर करण्यात आला.

अजितदादा हे कायद्याप्रमाणे वागणारे आणि जनतेच्या कामासाठी अहोरात्र झटणारे नेते आहेत. पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून असे अयशस्वी प्रयत्न होत आहेत. केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून अजितदादांची व राज्यातील इतर नेत्यांची प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र भाजपकडून रचण्यात येत आहे, हे जनता जाणून आहे.

मुळात अजितदादांबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना केवळ राजकीय हेतूने अशा प्रकारचे छापे टाकले जात आहेत. त्यात कोणताही संबंध नसताना केवळ अजितदादांचे नातेवाईक म्हणून त्यांनाही यामध्ये ओढले जात असून, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भाजपने केवळ राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न म्हणून राज्याची संस्कृती बिघडवू नये.

महाराष्ट्रात अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जेव्हा जेव्हा विघातक शक्तींनी हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे, तेव्हा तेव्हा मावळ्यांनी हे हल्ले अधिक ताकदीने परतावून लावले आहेत. सध्याही असाच प्रयत्न सुरू असून, अजितदादांच्या मावळ्यांकडून भाजपचे हे प्रयत्न निश्चितच परतावून लावले जातील, हे भाजपने लक्षात ठेवावे.

लोकशाही देशात सरकार येतात आणि जातात. परंतु, देशाचा गाभा असलेली लोकशाही मूल्ये जपावी लागतात. देशाचा आत्मा असलेल्या लोकशाहीवरच घाला घालण्याचा जो प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे, तो धोकादायक आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही खात्रीने सांगत आहोत. यातून काहीही धडा न घेता भाजपने यापुढेही सत्तेचा गैरवापर सुरूच ठेवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलन करून भाजपला धडा शिकवला जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.

तसेच, २० तारखेपासून शाळा – महाविद्यालये सुरू होत असून, क्रीडांगण परिसरात पोलिसांची गस्त सुरू करण्यात यावी. येत्या एक महिन्यात बूथ कमिटीच्या सर्व नियुक्त्या पूर्ण करण्याचाही ठराव या वेळी मंजूर करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.