Pune : राष्ट्रवादीसाठी आयात उमेदवार घेणार असल्याच्या भीतीने इच्छुकांची वाढली धाकधूक

एमपीसी न्यूज- आपलाच, आपलाच, आपलाच, डिपॉझिट गेले तरी आपलाच, आता असे न करता, काट्याने काटा काढावा लागतो, असे सांगून जोपर्यंत शिवसेना- भाजप उमेदवार जाहीर करत नाही, तोपर्यंत उमेदवार जाहीर करणार नाही असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील मेळाव्यात म्हटले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे.

खडकवासला मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात राष्ट्रवादीच राष्ट्रवादीचा पराभव करते. याची गंभीर दखल अजित पवार यांनी दखल घेतली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजप उमेदवाराला तब्बल 65 हजार मतांचा लीड होता. त्यामुळे पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणावेच लागेल, असा दम पवारांनी इच्छुकांना भरला.

येत्या 7 ऑक्टोबरला नेमके कोण कोणत्या पक्षाकडून उभे आहे, ते चित्र स्पष्ट होईल. उमेदवारांना प्रचारासाठी केवळ 12 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांना पायाला भिंगरी बांधावी लागेल. येत्या 8 दिवसांत म्हणजे शेवटच्या दिवशीच राष्ट्रवादी उमेदवार जाहीर करणार असल्याचे संकेत पवार यांनी दिले. यंदाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात काँग्रेस – राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले पाहिजे, त्यासाठी डोळ्यात तेल घालून काम करा, असा आदेश अजित पवार यांनीही कार्यकर्त्यांना दिला.

पुणे शहरातील चार मतदारसंघातून राष्ट्रवादी निवडणूक लढणार आहे. त्याची घोषणा पवार यांनी केली. पर्वती मतदारसंघातून नगरसेविका अश्विनी कदम, हडपसरमधून शहराध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, वैशाली बनकर, नगरसेविका नंदा लोणकर, नगरसेवक योगेश ससाणे, वडगावशेरीतुन माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक सुनील टिंगरे, खडकवासला मतदारसंघातून विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, पुणे महापालिकेचा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी महापौर दत्ता धनकवडे प्रबळ इच्छुक आहेत. स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी पर्वती मतदारसंघातून न लढता, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. येत्या काही दिवसात प्रत्येक मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.