Pune News : मोदी सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून गॅस सिलिंडर ‘श्राद्ध’ आंदोलन

एमपीसी न्यूज – गेल्या दोन वर्षांपासून मोदी सरकारने गॅस,पेट्रोल, डिझेल चे दर वाढवले आहेत. 2 दिवसांपूर्वीच मोदी सरकारने गॅसदरवाढ तब्बल 15 रूपयांनी वाढवली. या महागाईला निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीने पुण्यात गॅस सिलिंडर श्राद्ध घालत आज अनोखे आंदोलन केले. आतापर्यंत केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यभरातून आंदोलनाच्या माध्यमातून या महागाईचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीने सातत्याने विरोध केला आहे. 

आतापर्यंत आंदोलन करून सुद्धा मोदी सरकार गॅस दरवाढ कमी करेना, या मुद्यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीने पुण्यात व राज्यात आज मोदी सरकारने वाढवलेल्या महागाई विरोधात गॅस सिलिंडर श्राद्ध घालत आज अनोखे आंदोलन केले.

आंदोलनाच्या वेळी मोदी सरकारने वाढवलेल्या महागाईचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीकडून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यश रुपाली चाकणकर यांनी केले. तर, हे आंदोलन पुण्यात अलका टॉकीज चौक येथे करण्यात आले.

या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा मुणाल वाणी, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, अनिता पवार, ज्योती सुयवशी, प्राजक्ता जाधव,रत्ना नाईक,मंगल ताई,सविता मारणे, सोनाली उजागरेव राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

दरम्यान, रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘गेल्या दोन महिन्यापासून गॅसचे दर भरपूर वाढवले आहेत. या गॅसच्या सबसिडी मधून केंद्र सरकारला पैसे मिळत आहेत. सर्वसामान्य नागरिकांचा केंद्र सरकारने अंत पाहिला आहे. दोन महिन्यापूर्वी 5,10 रुपयाने गॅस वाढत होता, पण तो दोन दिवसापूर्वी 15 रुपयांनी वाढला यातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला पार्टी अख्या राज्यभरात
गॅस सिलिंडर श्राद्ध घालत आंदोलन करत आहोत.’

तसेच याप्रसंगी प्रशांत जगताप म्हणाले, ‘उत्तर प्रदेशातील लखिमपुर येथे एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले ही घटना दुर्दैवी असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर काहीतरी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. मोदी सरकारला आमची एक विनंती आहे की सर्वसामान्य नागरिकांचा अंत बघु नका.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.