Pune : राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांना आवरता आले नाही अश्रू

एमपीसी न्यूज – माझ्या प्रभागात सहा लोकांचे जीव गेले. हा महापूर स्मार्ट सिटीला काळिमा फासणारा आहे. झोपडपट्टी सोबतच सोसायट्यांनाही याचा फटका बसला आहे. स्मशान शांतता आहे,, अशा शब्दांत सांगून राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांना अश्रू आवरता आले नाही. महापालिका आयुक्तांनी फोन न घेतल्याने मी त्यांच्या घरी भेटायला गेले. 15 – 15 हजार मदत देणार म्हटले होते. पण, 5 हजारही मदत मिळली नसल्याचे वास्तव कदम यांनी सर्वसाधारण सभेत मांडले.

पुणे शहरात महापूर आला असताना महापालिका आपत्ती व्यवस्थापन नेमके काय करत होते, असा सवाल सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला.

नगरसेविका आरती कोंढरे म्हणाल्या, पुणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन नेमके काय करते? ढिसाळ कारभार महापालिकेत सुरू आहे. भविष्यात असे संकट आले तर, हा आपत्ती विभाग सक्षम करावा. त्यावर अंकुश असावा. अद्यापही महापूरग्रस्तांचे नेमके किती नुकसान झाले, याचा अहवाल सादर केला नाही.

नगरसेवक प्रवीण चोरबेले म्हणाले, महर्षी नगरमध्ये आजही नाल्यामध्ये बांधकाम सुरू आहे. महापुरात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात नाल्यावर बांधकामे होत असल्याने हे संकट निर्माण झाले आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून कठोर कारवाई करून नाल्यावरील बांधकामे काढण्यात यावी.

नगरसेवक अजय खेडेकर म्हणाले, अतिक्रमणाला नेमके कोण जबाबदार आहेत? याचा शोध घेतला पाहिजे. यापुढे आशा दुर्घटना घडू नये यासाठी, दक्ष राहावे. काही ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले नाही. या लोकांचे तातडीने पुनर्वसन व्हावे.

नगरसेविका मुक्ता जगताप म्हणाल्या, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरांत पाणी घुसले. आपण स्मार्ट सिटीत राहत असताना लोहगाव भागात नागरीक उघड्यावर शौचालयाला जातात. ड्रेनेज लाईन टाकू दिली जात नाही. अतिरिक्त आयुक्तांनी घटनास्थळी भेट द्यावी. तर, आम्ही महापूर आला असताना नागरिकांना मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केली. पण, आम्हाला प्रधासनाची साथ मिळाली नसल्याचे नगरसेवक प्रकस कदम यांनी सांगितले. योगेश ससाणे, मंजुषा नागपुरे यांनीही प्रशासनावर टीका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like