Pune : ‘स्टार्ट अप’च्या यशासाठी अपडेट राहणे गरजेचं -भूषण पाटील

एमपीसी न्यूज – ‘स्टार्ट अप’ला यशस्वी बनविण्यासाठी आपण नेहमी अपडेट राहून नव्या गोष्टी आत्मसात करायला शिकले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या ‘स्टार्ट अप’ला अधिकाधिक ग्राहकाभिमुख बनवण्याला प्राधान्य द्यावे, असे मत मल्टिप्लाय व्हेंचर्सचे संस्थापक आणि पेटीएम व अलिबाबाचे माजी संचालक भूषण पाटील यांनी ‘पुणे स्टार्ट अप फेस्ट’च्या उदघाटनप्रसंगी व्यक्त केले.

कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे आणि भाऊज आंत्रप्रेन्युअर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या ‘पुणे स्टार्ट अप फेस्ट’चे उदघाटन भूषण पाटील व भारत फोर्जचे अमित कल्याणी यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी बोलत असताना भूषण पाटील म्हणाले जग वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानात रोज नवे बदल होत आहेत. त्यामुळे आपण सुरु केलेल्या स्टार्टअपला यशस्वी बनविण्यासाठी आपण अपडेट राहून नव्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात. त्याचबरोबर आपल्या स्टार्टअपला अधिकाधिक ग्राहकाभिमुख बनवण्याला प्राधान्य द्यावे, तसेच भारतीय ग्राहक पेठेची ताकद मोठी असून प्रत्येक वापरकर्त्याला स्व-सक्षम करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. स्टार्टअप सुरु करताना खर्चाच्या बाबतीत काटेकोर असणे गरजेचे आहे. ग्राहक अधिकाधिक स्वावलंबी होत असल्याने त्यानुसार आपल्या सेवेत बदल करणे क्रमप्राप्त असल्याचे पाटील म्हणाले.

या कार्यक्रमावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रशांत खटावकर, सीओईपी चे उपसंचालक प्रा. मुकुल सुतावणे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावर्षी १४० स्टार्टअप्स आणि १०० हुन अधिक गुंतवणूकदारांनी या महोत्सवात सहभाग नोंदवला असून यामध्ये तांत्रिक, सामाजिक, विद्यार्थी, शेती,आरोग्य, जीवनशैली आणि नाविन्यता असे एकूण सात विभाग करण्यात आले आहेत.

उद्द्योजक अमित कल्याणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कठोर मेहनत, जिद्द आणि कल्पना शक्तीच्या जोरावर कोणीही स्टार्टअप सुरु करू शकतो. आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत सुविधा सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी स्टार्टअप्सचा उपयोग होऊ शकतो. वाढत्या पर्यावरणीय समस्यांमुळे पर्यावरण क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठी संधी आहे. या शिवाय भविष्यात पाणी, रहदारी आणि शहरीकरण यासारख्या समस्यांवर उत्तरे शोधणाऱ्या स्टार्टअप्सना मागणी असणार आहे, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.