Pune : जिल्ह्यात एका रात्रीत 53 नवीन रुग्णांची वाढ; कोरोनाबधितांची एकूण संख्या 934

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेपर्यंत तब्बल 53 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या आत 934 वर पोहोचली आहे. एका रात्रीत एवढी संख्या वाढल्याने शहरात एकच चर्चा सुरू आहे.

बुधवारी रात्रीपर्यंत पुणे जिल्ह्यात 881 कोरोना बाधित रुग्ण होते. तर 59 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात आजपर्यंत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. शहरात कोरोना दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे.

बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुणे महापालिका क्षेत्रात 770, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 59, सिव्हिल सर्जन आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 27 तर जिल्हा रुग्णालयांमध्ये 25 असे एकूण 881 कोरोनाचे रुग्ण होते. त्यानंतर रात्री आलेल्या चाचणी अहवालात एकदम 53 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. पुणे जिल्ह्यात पुणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद असून कोरोनाचे सर्वाधिक बळी देखील पुणे शहरातच गेले आहेत.

कोरोनाचे संक्रमण थोपविण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी, शहराच्या सीमा सील करणे आदी सर्व प्रकारची उपाययोजना करण्यात येत आहे. पुण्याच्या दहा पोलीस ठाण्यांमधील कोरोनासंसर्गाचा जास्त धोका असणाऱ्या भागांमध्ये संचारबंदी अधिक कडक करण्यात आली आहे. तरी देखील रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढत असल्याने पुणेकरांच्या काळजीत भरच पडत आहे. महाराष्ट्रात मुंबईनंतर कोरोनाच्या संसर्गात पुणे शहराचा क्रमांक लागत असून शहरातील कोरोनाच्या मृत्यूंचे प्रमाणही जास्त आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी शहरात लॉकडाऊनमध्ये दिलेल्या सर्व प्रकारच्या सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात येईल, असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.